India Pakistan Latest Update: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळे उडवली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. भारताच्या दहशतवाद्यांविरोधातील लष्करी कारवाईने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. त्यातच पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचे अपयशी प्रयत्न केले. पण, तिथेही पाकिस्तानची फजिती झाली. दरम्यान, शुक्रवारी एका पोस्टने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. ती पोस्ट करण्यात आली होती पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून. पण, नंतर समोर आले की हे अकाऊंटच हॅक झालं आहे. संपूर्ण प्रकरण समजून घ्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या एक्स हॅण्डलवर एक पोस्ट टाकण्यात आली. ही पोस्ट वाचून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही पोस्टच अशी होती. काय म्हटलेलं होतं या पोस्टमध्ये?
आम्हाला कर्ज द्या, तणाव कमी करण्यासाठी मदत करा
'शत्रूने प्रचंड नुकसान केल्याने पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांना (देश) अधिक कर्ज देण्याचे आवाहन केले आहे. वाढत चाललेले युद्ध आणि शेअर बाजार कोसळत असून, हा तणाव कमी करण्यासाठी मदत करण्याचे आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदार देशांना आवाहन करतो, अशी ही पोस्ट होती.
पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याच्या एक्स अकाऊंटवरून तणाव वाढलेला असताना केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर पाकिस्तान सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबद्दल अधिकृत खुलासा केला.
ते अकाऊंट हॅक झाले आहे -पाकिस्तान
पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फॅक्ट चेकर अकाऊंटवरून याबद्दल माहिती देण्यात आली. सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे एक्स अकाऊंट हॅक करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.
पाकिस्तानात आर्थिक व्यवहार मंत्रालय हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मंत्रालयाकडे जगभरातील आर्थिक व्यवहारांची जबाबदारी आहे. दुसऱ्या देशांकडून कर्ज घेणे, दुसऱ्या देशांना आर्थिक मदत करणे, परदेशातील गुंतवणूक आणणे अशी कामे या मंत्रालयाच्या माध्यमातून केली जातात. मात्र, त्याच मंत्रालयाचे अकाऊंट हॅक झाल्याने पाकिस्तानची फजिती झाली आहे.