VIDEO: लग्नात नवरदेवाची चक्क अंडरटेकर स्टाइलमध्ये एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 16:23 IST2018-01-30T16:22:28+5:302018-01-30T16:23:07+5:30
आतापर्यंत तुम्ही लग्नात नवरदेव किंवा नवरमुलगीचा अत्यंत साध्या पद्धतीने होणारा प्रवेश पाहिला असेल. पण पाकिस्तानमधील नवरदेवाने तर चक्क WWF स्टाइलमध्ये प्रवेश केला

VIDEO: लग्नात नवरदेवाची चक्क अंडरटेकर स्टाइलमध्ये एंट्री
इस्लामाबाद - आजकाल आपल्या लग्नात काहीतरी वेगळं करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. प्री-मॅरेज फोटो शूट तसंच प्री-वेडिंग फोटोशूटचा तर सध्या ट्रेंड आहे. याशिवाय डेस्टिनेशन वेडिंग करण्यावरही प्रत्येकाचा भर असतो. पण यापेक्षाही काहीतरी आपण वेगळं करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. याआधी अत्यंत साध्या पद्धतीने होणारी लग्नं आता धूमधडाक्यात होऊ लागली आहेत. लग्नात मेन्यूपासून ते लग्नमंडपाची सजावट ते कपड्यांपासून प्रत्येक गोष्ट अगदी ठरवून केलेली असते. लग्नमंडपात प्रवेश करतानाही आपली एंट्री एखाद्या चित्रपटाप्रमाणे असावी असाही प्रयत्न चालू असतो. म्हणजे तसं खास वेडिंग प्लॅनरला सांगितलं जातं. असाच एक नवरदेव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
आतापर्यंत तुम्ही लग्नात नवरदेव किंवा नवरमुलगीचा अत्यंत साध्या पद्धतीने होणारा प्रवेश पाहिला असेल. पण पाकिस्तानमधील नवरदेवाने तर चक्क WWF स्टाइलमध्ये प्रवेश केला. मंडपात प्रवेश करण्यासाठी नवरदेवाने WWF स्टार अंडरटेकरची निवड केली होती. त्याच्या स्टाइलप्रमाणे डोक्यावर टोपी घालून, एकदम हळू हळू पाऊलं टाकत नवरदेव मंडपात आला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
खरंतर, वरात येण्याची वेळ झाली होती. सगळेजण नवरदेवाची वाट पाहत थांबले होते. याचवेळी अचानक डोक्यावर काळी टोपी घातलेला आणि काळे कपडे घातलेल्या एका व्यक्तीने मंडपात प्रवेश केला. यावेळी सगळेजण त्याला पाहून हैराण झाले. अंडरटेकर स्टाइलमध्ये येणारी ही व्यक्ती कोण आहे हेच नेमकं कोणाला माहिती नव्हतं. पण नंतर हाच नवरदेव असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं.
पाकिस्तानमध्ये याआधीही एका व्यक्तीने अशाच प्रकारे आपल्या लग्नात एंट्री केली होती. ट्रिपल एच स्टाइलमध्ये एंट्री करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.