अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:16 IST2025-05-10T14:08:52+5:302025-05-10T14:16:33+5:30
नॅशनल कमांड अथॉरिटीची अशी कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे.

अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले...
भारताविरुद्धच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानच्या सरकारने अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याच्या वृत्ताला पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांना नकार दिला आहे. नॅशनल कमांड अथॉरिटीची अशी कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आधी पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी भेटण्यासाठी बोलवल्याचे म्हटले जात होते. मात्र, माहिती मंत्र्यांनी याला तत्काळ प्रतिसाद दिला नसल्याचा दावा केला जात आहे.
या संदर्भात एआरवाय टीव्हीशी बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले की, "तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत आहात, ती अस्तित्वात आहे. पण त्याबद्दल आता काही बोलू नये. ही खूप दूरची शक्यता आहे, सध्या त्यावर काहीही चर्चा करू नये. आपण त्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी परिस्थिती शांत होईल, असे मला वाटते. मात्र, सध्या नॅशनल कमांड अथॉरिटीची कोणतीही बैठक झालेली नाही आणि अशी कोणतीही बैठक नियोजित नाही."
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांनी स्थानिक टेलिव्हिजनशी बोलताना सांगितले की, "जर भारत येथे थांबला तर, आम्ही येथे थांबण्याचा विचार करू."
भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. पाकिस्तानच्या हल्ल्यांबद्दल भारतीय लष्कराने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, "शत्रुत्वाच्या सर्व कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि त्यांना योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे."