ज्या ठिकाणी झाली भारतीय पत्रकाराची हत्या, तिथे फडकत आहेत पाकिस्तान आणि तालिबानचे झेंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:36 IST2021-07-19T16:33:45+5:302021-07-19T16:36:36+5:30
Pakistan And Taliban:पाकिस्ताननं तालिबानच्या मदतीसाठी 10 हजार सैनिकांना अफगानिस्तानच्या वॉर-झोनमध्ये पाठवल्याची माहिती

ज्या ठिकाणी झाली भारतीय पत्रकाराची हत्या, तिथे फडकत आहेत पाकिस्तान आणि तालिबानचे झेंडे
कंधार: अफगाणिस्तानच्या ज्या स्पिन बोल्डक परिसरात 16 जुलै रोजी भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती, त्या ठिकाणी आता तालिबान आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसत आहेत. यावरुन तालिबानसाठी असलेलं पाकिस्तानचं प्रेम समोर आलंय. दरम्यान, पाकिस्ताननं तालिबानच्या मदतीसाठी आपल्या 10 हजार सैनिकांना अफगानिस्तानच्या वॉर-झोनमध्ये पाठवल्याची माहितीही समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI नं त्यांच्या सैन्याला अफगाणिस्तानातील भारताने तयार केलेलं इंफ्रास्ट्रक्चर उद्धवस्त करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षापासून दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क अफगानिस्तानातील भारतीय असेट्सला नुकसान पोहचवत असून, या संघटनेलाही पाकिस्तानचं समर्थन आहे.
भारताची अफगाणिस्तानात 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक
मागील दोन दशकात भारताने अफगाणिस्तानात अनेक क्षेत्रांमध्ये 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. यात अफगाणी संसदेसह अनेक राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण आहे. तसेच, भारताने अफगाणिस्तानातील शिक्षण क्षेत्रातही योगदान दिले आहे. शिक्षकांच्या ट्रेनिंगपासून शिक्षणासाठी लागणारे इंफ्रास्ट्रक्चर भारताने तयार करुन दिले आहे.
दानिशच्या मृत्यूवर तालिबानचे स्पष्टीकरण
तालिबानने शुक्रवारी फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकीच्या हत्येवर दुःख व्यक्त केलं. तालिबानकडून सांगण्यात आलं की, आम्हाला न सांगता पत्रकार युद्ध क्षेत्राकडे येत आहेत. कोणाच्या गोळीत दानिश यांचा मृत्यू झाला, हे आम्हाला माहित नाही. यापुढे युद्ध क्षेत्राकडे एखादा पत्रकार येत असेल, तर त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊ.