आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 21:41 IST2023-10-02T21:41:37+5:302023-10-02T21:41:58+5:30
चीनचे यान चंद्राच्या त्या बाजुकडचे सॅम्पल घेऊन येणार आहे. आजवर आपल्याला दिसत असलेल्या बाजुचेच सॅम्पल आणले गेले आहेत.

आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार'
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले. परंतू, एक देश दहशतवादाच्या वाटेवर आणि दुसरा आपला भारत देश त्या दहशतवादाविरोधात लढत विकासाच्या वाटेवर निघाला. आज अशी परिस्थिती आहे की भारत जगातील महासत्ता बनण्याकडे पाऊले टाकत आहे आणि पाकिस्तान तर भिकारी देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावार गेला आहे. अशातच भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवरून पाकिस्तानींनी आपल्याच देशाला धु धु धुतले होते.
चीनची अंतराळ संस्था चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (CNSA) ने पुढील वर्षी चंद्र मोहिम आखणार असल्याचे जाहीर केले आहे. चीन आपल्यासोबत अन्य देशांचे उपग्रह घेऊन जाणार आहे. यामध्ये पाकिस्तानही आपला पेलोड पाठविणार आहे. सध्या हे मिशन डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. चीनचे हे Chang'e-6 मिशन असणार आहे.
चांगई - ६ मिशनमध्ये चीन चंद्राची पृथ्वीपासूनची दूरची म्हणजेच भारताचे चंद्रयान उतरले त्या अंधाऱ्या बाजुवर आपले यान उतरविणार आहे. आता पाकिस्तान तो, फुकट काय मिळतेय ते घेण्यासाठी तिथेही धावला आहे. भारत पोचला मग चीनही मागे कसा राहिल अशा उद्देशाने जाणाऱ्या या यानात पाकिस्तान आपला चौकोनी सॅटेलाईट पाठविणार आहे.
चीनचे यान चंद्राच्या त्या बाजुकडचे सॅम्पल घेऊन येणार आहे. आजवर आपल्याला दिसत असलेल्या बाजुचेच सॅम्पल आणले गेले आहेत. पाकिस्तानचा क्यूबसॅट हा अतिशय सूक्ष्म उपग्रह आहे. जो १ बाय १ फुटाच्या आकाराचा चौकोनी बॉक्सटाईप असणार आहे. या वर्षी पाकिस्तानने चीनच्या तियांगॉन्ग स्पेस स्टेशनवर काही बिया पाठवल्या होत्या. पाकिस्तान सध्यातरी तेवढेच करू शकतो. बिया पाठवून तसेच एखादा उपग्रह पाठवून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवू पाहत आहे.