पाकिस्तान ट्रेन हायजॅक: लष्कराचा १०४ जणांना वाचविल्याचा दावा, बलुच आर्मीचा सोडल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:55 IST2025-03-12T07:54:47+5:302025-03-12T07:55:11+5:30
Pakistan Train Hijack latest news: बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावादी बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणलेले आहे.

पाकिस्तान ट्रेन हायजॅक: लष्कराचा १०४ जणांना वाचविल्याचा दावा, बलुच आर्मीचा सोडल्याचा दावा
पाकिस्तानात बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेने २१४ प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचे अपहरण केले होते. या अपहरणावेळी ट्रेनमधील सहा पोलिसांना मारण्यात आले होते. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पाकिस्तानने १०४ प्रवाशांना वाचविल्याचा दावा केला आहे. तसेच १६ बीएलएचे दहशतवादी मारले गेल्याचेही सांगितले आहे.
बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावादी बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणलेले आहे. चीनचे सुरु असलेल्या प्रकल्पांवरही ही संघटना हल्ले करत आहे. अशातच मंगळवारी एका बोगद्यात जात असलेली ट्रेन हायजॅक करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. बलुचिस्तान प्रदेशातील एका बोगद्यात ट्रेन शिरताच, बलुच बंडखोरांनी त्यावर हल्ला केला आणि ट्रेनचा ताबा घेतला. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अतिरेक्यांच्या तावडीतून १०४ ओलिसांची सुटका केली आहे.
तर दुसरीकडे बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केल्याने महिला आणि मुलांना सोडण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने कारवाई केली परंतू त्यांचा हल्ला उधळून लावण्यात आला आहे. सर्व बलुच लढवय्ये सुरक्षित आहेत. आता ओलिस असलेले लोक हे बहुतांश पाकिस्तानी सैन्याचे कर्मचारी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
बलुच आर्मीच्या मागण्या काय...
बलुचिस्तानला ते एक वेगळा प्रांत, एक वेगळा देश मानतात. तिथे वेगळे सरकार चालवतात. बलुचिस्तानमध्ये कोणत्याही पाकिस्तानी एजन्सीचा किंवा सुरक्षा एजन्सीचा प्रतिनिधी नसावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. चीनसोबत सुरु असलेले सीपीईसी प्रकल्प खनिजांचे शोषण करत आहेत. यामुळे समुदायाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावे लागले आहे. अनेक वर्षांपासून हे प्रकल्प येथून हटवण्याची मागणी करत आहेत.