Pakistan Train Hijack:पाकिस्तानातील क्वेटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस ट्रेन बलुचिस्तान प्रांतात हायजॅक केल्याची धक्कादायक घटना काल(11 मार्च) उघडकीस आली. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) या घटनेची जबाबदारी असून, त्यांनी आज या घटनेचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत ट्रेनवर बॉम्ब हल्ला करुन ट्रेन ताब्यात कशी घेतली, हे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने आतापर्यंत 150 हून अधिक ओलिसांची सुटका केली आहे, परंतु 100 हून अधिक ओलीस अजूनही बीएलएच्या ताब्यात आहेत. बलुच आर्मीने 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. बलुच कैद्यांची सुटका करण्याचा हा अल्टिमेटम आहे. दरम्यान, बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि बलुच बंडखोरांमध्ये चकमक सुरुच आहे. पाकिस्तानी लष्कराने 27 बलोच बंडखोरांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे, तर 40+ पाकिस्तानी सैनिकही ठार झाले आहेत.
BLA ने ट्रेन कशी हायजॅक केली?दररोज प्रमाणे काल (11 मार्च) रोजी जाफर एक्सप्रेस क्वेटाहून पेशावरसाठी निघाली होती. जेव्हा ट्रेन बालोन टेकड्यांमधील बोगद्यातून जात होती, तेव्हा घात लावून बसलेल्या बीएलएच्या 8 सशस्त्र दहशतवाद्यांनी ट्रेनवर हल्ला केला. जाफर एक्स्प्रेसच्या 9 डब्यांमध्ये सुमारे 500 प्रवासी होते. बोलन हा क्वेटा आणि सिबी दरम्यान 100 किलोमीटरहून अधिकचा डोंगराळ भाग आहे. या भागात 17 बोगदे आहेत, ज्यातून रेल्वे ट्रॅक जातो. दुर्गम भागामुळे येथे अनेकदा ट्रेनचा वेग कमी असतो. दरम्यान, हल्लेखोरांनी पिरू कुंरी आणि गुडालार या डोंगराळ भागाजवळील बोगद्यात ट्रेन थांबवली आणि हायजॅक केले.