पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारचा जनतेला आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती २७० रुपयांच्या पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 11:00 IST2023-08-02T11:00:32+5:302023-08-02T11:00:57+5:30
पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १९ रुपयांनी मोठी वाढ केल्याची घोषणा केली.

पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारचा जनतेला आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती २७० रुपयांच्या पुढे
गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तानमध्येमहागाईही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानातील जनतेची अवस्था दयनीय होत आहे. संपूर्ण देश महागाईने होरपळत आहे. आता शाहबाज सरकारने जनतेला आणखी एक मोठा झटका दिला आहे. आता पाकिस्तानने मंगळवारी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात १९ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे येथे पेट्रोलचा दर २७२.९५ रुपये आणि डिझेलचा दर २७३.४० रुपये प्रतिलिटर झाला आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी या दरवाढीचे वर्णन ‘राष्ट्रीय हित’ असे केले आहे.
१८ मतांनी बदललं राज्यसभेतील गणित; मोदी सरकारला दिलासा, विरोधकांना बसला फटका
अर्थमंत्री इशाक दार यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १९ रुपयांनी मोठी वाढ करण्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुधारित किमती तत्काळ प्रभावाने लागू होतील. अर्थमंत्र्यांनी सांगितले की जर सरकारने IMF सोबत करार केला नसता तर जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम डेव्हलपमेंट लेव्ही मध्ये कपात केली असती.
याआधीही पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळाला नव्हता. यापूर्वी पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५३ रुपये आणि डिझेल २५३.५० रुपये प्रति लिटर होते. पाकिस्तान सरकारला या किमती वाढवायला भाग पाडले आहे कारण ते आयएमएफच्या अटींना बांधील आहे. ३ अब्ज डॉलरची स्टँडबाय व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी यासाठी IMF ने कठोर अटी घातल्या आहेत. कराराच्या अटींपैकी एक म्हणजे पेट्रोलियम लेव्ही प्रति लीटर ६० रुपये वाढवली.