झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:39 IST2025-07-13T13:38:24+5:302025-07-13T13:39:50+5:30
Pakistan News: पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींवर राजीनामा देण्यासाठी दबाव आहे.

झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
Pakistan News: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीरला फील्ड मार्शलपदी बढती दिली. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या राजकारणात एक नवीन चर्चा किंवा वाद सुरू झाला आहे. असीम मुनीर राष्ट्रपती होऊ इच्छित असल्याने विद्यमान राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावर राजीनामा देण्यासाठी खूप दबाव असल्याचा दावा केला जातोय. या वादावर आता स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया आली आहे.
शाहबाज शरीफ यांनी या दाव्याचे खंडन केले आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी कधीही राष्ट्रपती होण्याची इच्छा व्यक्त केली नाही किंवा त्यांनी अशी कोणतीही योजना आखली नाही, असे सांगितले. शहबाज शरीफ यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी गुरुवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, शाहबाज शरीफ, आसिफ अली झरदारी आणि असीम मुनीर यांच्याविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमेमागे परदेशी शक्तींचा हात आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्र्यांनी काय म्हटले?
पाकिस्तानचे गृहमंत्र्यांनी सांगितले की, या खोट्या दाव्यांमागे कोण आहे, हे आम्हाला माहिती आहे. मी स्पष्ट केले आहे की, राष्ट्रपतींसोबत राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा लष्करप्रमुखांची राष्ट्रपती होण्याची योजना नाही. पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी परदेशी एजन्सींद्वारे असे कट रचले जाताहेत, असा दावा त्यांनी केला.
असीम मुनीरचा कार्यकाळ वाढवला
जनरल असीम मुनीरला २०२२ मध्ये ३ वर्षांसाठी लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु नंतर शाहबाज सरकारने त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवला. गेल्या वर्षी आसिफ अली झरदारी यांना ५ वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती बनवण्यात आले होते. शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिल्याच्या बदल्यात त्यांना हे पद मिळाले. दरम्यान, आसिफ अली झरदारी हे बिलावल भुट्टो यांचे वडील आहेत.