चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:35 IST2025-12-23T18:33:25+5:302025-12-23T18:35:53+5:30
China Pakistan Relationship Jf-17 Fighter Jets: हा व्यवहार पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र विक्रींपैकी एक मानला जात आहे.

चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
China Pakistan Relationship Jf-17 Fighter Jets: भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध भडकले तेव्हापासूनच चीनने उघडपणे पाकिस्तानला समर्थन देऊ केले आहे. तशातच आता चीनने पैसे कमविण्यासाठी मध्यस्थांचा वापर सुरू केला आहे. ते आता इतर देशांना चिनी बनावटीची लढाऊ विमाने विकत आहे. चार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अलीकडेच हे उघड केले. त्यांनी सांगितले की पाकिस्तानने लिबियन नॅशनल आर्मीसोबत ४.६० अब्ज डॉलर्सचा लष्करी उपकरणांचा करार केला आहे. लिबिया सध्या संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्रास्त्र निर्बंधाखाली आहे. अशा वेळी हा करार करण्यात आला. हा पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र विक्रींपैकी एक मानला जात आहे.
या करारातील प्रमुख घटक म्हणजे चीनमध्ये उत्पादित आणि चीन व पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केलेली JF-17 लढाऊ विमाने. ही विमाने पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय बाजारात विकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात पूर्व लिबियातील बेनगाझी शहरात पाकिस्तानचे लष्करी प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि लिबियन नॅशनल आर्मी (LNA)चे डेप्युटी कमांडर-इन-चीफ सद्दाम खलिफा हफ्तर यांच्यातील बैठकीनंतर या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले.
लिबियाकडून कराराला मान्यता
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय किंवा लष्कराकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. कराराच्या मसुद्यानुसार, लिबिया १६ JF-17 लढाऊ विमाने आणि १२ सुपर मुशाक प्रशिक्षण विमाने खरेदी करत आहे. पाकिस्तान JF-17 विमानाबाबत मार्केटिंग करताना, ते कमी किमतीचे परंतु आधुनिक लढाऊ विमान म्हणून असे सांगत आहे. तर सुपर मुशाकचा वापर सुरुवातीच्या पायलट प्रशिक्षणासाठी केला जात आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की या करारात लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी लष्करी उपकरणे समाविष्ट आहेत. हे साहित्य सुमारे अडीच वर्षांत वितरित केले जाईल. लिबियन नॅशनल आर्मी (LNA) च्या अधिकृत मीडिया चॅनेलनेही पाकिस्तानसोबतच्या कराराची पुष्टी केली आहे. LNA प्रमुख खलिफा हफ्तर यांनी सांगितले की पाकिस्तानसोबत धोरणात्मक लष्करी सहकार्याचा एक नवीन टप्पा सुरू झाला आहे.