Pakistan Independence Day Celebration gone wrong : पाकिस्तानातील कराचीमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान हवाई गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला, ज्यात एक ज्येष्ठ नागरिक आणि एका ८ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. बेजबाबदारपणे केलेल्या सेलिब्रेशनच्या गोळीबारात ६० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनीनुसार, एका बचाव अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशा घटना संपूर्ण शहरात पाहायला मिळाल्या. अझीझाबादमध्ये अशाच प्रकारच्या हवाई गोळीबारात एक तरुणी जखमी झाली. याशिवाय कोरंगीमध्ये उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारात स्टीफन नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पाकिस्तानी वृत्तवाहिनीनुसार, शहरात अशा घटनांमध्ये किमान ६४ इतर लोक गोळ्यांनी जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांकडून घटनेचा निषेध
बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारात डझनभर लोक जखमी झाले आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध केला आणि ही कृती निष्काळजीपणाची व धोकादायक असल्याचे म्हटले. अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिन सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि हवेत गोळीबार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
याआधीच्या घटनांमध्ये ४२ जणांचा मृत्यू
पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार, जानेवारीमध्ये कराचीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये पाच महिलांसह किमान ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय २३३ जण जखमी झाले. शहराच्या वेगवेगळ्या भागात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये दरोडेखोरांचे प्रयत्न हाणून पाडताना काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, हवेत गोळीबार करण्याच्या इतर घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.