भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:58 IST2025-12-19T13:55:50+5:302025-12-19T13:58:45+5:30
देशाच्या संसदेत अणुऊर्जा विधेयक (शांती विधेयक) मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आलेले अणुऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करणारे शांती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. दरम्यान, भारताने शांती विधेयक मंजूर केल्यानंतर पाकिस्तानने चिंता व्यक्त केली आहे. भारतातील अणुऊर्जा क्षेत्रातील चिंताजनक घटनांचा इतिहास बघत आम्ही त्यावर नजर ठेवणार आहोत, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
या प्रस्तावित कायद्यामुळे खासगी क्षेत्राला अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी खुली होईल, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली आहे. या विधेयकावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना चिंता व्यक्त केली.
"भारताच्या अणऊर्जा सुरक्षेच्या संबंधित चिंताजनक घटनांचा इतिहास बघता आम्ही या सगळ्या घटनाक्रमावर जवळून नजर ठेवणार आहोत. १९९० च्या दशकापासून ते आतापर्यंत किरणोत्सर्ग साहित्याची चोरी आणि त्याच्याशी संबंधित माहितीची अवैध विक्री केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत", असे अंद्राबी म्हणाले.
अंद्राबी यांनी असेही म्हटले आहे की, "यामुळे खासगी व्यक्तींना संवेदनशील अणऊर्जा साहित्यापर्यंत पोहचण्यापासून रोखण्यासाठी जागतिक पातळीवर जे प्रयत्न सुरू आहेत, त्यालाच आव्हान मिळू शकते."
मला आशा आहे की, अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होणार नाही. ती टाळता येईल यासाठी पुरेशा सुरक्षित उपाययोजना केल्या जातील. कारण अणुऊर्जा क्षेत्रातील संवेदनशील साहित्य आणि त्याच्याशी निगडित माहिती व्यवस्थापनातील खासगी भागीदाराला दिली जाणे, हा चिंतेचा विषय होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.