पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान; अमेरिकन अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 03:40 IST2020-06-26T03:40:42+5:302020-06-26T03:40:59+5:30
दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान असल्याने जानेवारी २०१८ मध्ये पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा अमेरिकेचा निर्णय २०१९ मध्येही प्रभावी राहिला.

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान; अमेरिकन अहवाल
संयुक्त राष्ट्र : जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक मसूद अजहरविरुद्ध कारवाई न केल्याने पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे अमेरिकेने अहवालात नमूद केल्यानंतर संयुक्त राष्ट्रानेही सर्व सदस्य देश सुरक्षा परिषदेच्या प्रासंगिक ठरावातहत जबाबदारीचे पालन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या विदेश विभागाने संसदीय अधिकारप्राप्त समितीच्या २०१९ च्या दहशतवादावरील वार्षिक अहवालात म्हटले आहे की, दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान असल्याने जानेवारी २०१८ मध्ये पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा अमेरिकेचा निर्णय २०१९ मध्येही प्रभावी राहिला.
संयुक्त राष्ट्राचे सदस्य देश सुरक्षा परिषदेच्या प्रासंगिक ठरावातहत जबाबदारीचे पालन करतील, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅन्टीनियो गुतारेस यांनी व्यक्त केली आहे. गुतारेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, अमेरिकेच्या अहवालावर गुतारेस टिपणी करणार नाहीत. तथापि, आम्हाला सर्व सदस्यांकडून सुरक्षा परिषदेचा ठराव किंवा निर्णयातहत आपली जबाबदारी पाळली जाण्याची अपेक्षा आहे. अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तान आजही दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे.