पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:42 IST2025-10-29T15:42:02+5:302025-10-29T15:42:02+5:30
Pakistan vs Hamas: असीम मुनीरच्या मोसाद अन् CIA सोबत गुप्त बैठका झाल्याचाही दावा

पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
Pakistan vs Hamas: इंटरनेशन स्टॅबेलाइजेशन फोर्स (ISF)चा भाग म्हणून पाकिस्तान गाझा पट्टीत २०,००० जवानांचे सैन्य पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाली आहे. हमासचा खात्मा करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहाकार्याने हे दल तयार केले जात आहे. अहवालानुसार, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे लष्कर अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील गुप्त कराराचे अनुसरण करू शकते. जर असे झाले तर ते पाकिस्तान आणि इस्रायलमधील संबंधांमध्ये एक ऐतिहासिक बदल घडून येऊ शकेल.
मुनीरच्या मोसाद आणि CIA सोबत गुप्त बैठका
जर पाकिस्तानने खरोखरच गाझामध्ये सैन्य पाठवले तर या निर्णयाला इराण, तुर्की आणि कतार सारख्या देशांकडून तीव्र विरोध होऊ शकतो. कारण हे तिन्ही देश दीर्घकाळापासून हमासचे समर्थक आहेत. सीएनएन-न्यूज१८ च्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अलीकडेच इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकन सीआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका केल्या. या बैठकीमध्ये गाझामध्ये पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यावर सहमती झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की ही संपूर्ण योजना एका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व धोरणात्मक बदलाचा भाग आहे.
गाझामध्ये पाकिस्तानी सैनिकांची भूमिका काय असेल?
सूत्रांचा असा दावा आहे की, पाकिस्तानी सैन्याचे खरे ध्येय हमासला निष्क्रिय करणे आणि गाझामध्ये पूर्वपरिस्थिती स्थापित करणे हे असेल. मानवतावादाची पुनर्बांधणी असे या मोहीमेचे वर्णन केले जाणार आहे. पण वास्तविक उद्देश इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या सशस्त्र गटांमध्ये बफर झोन तयार करणे असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच हे सैन्य अमेरिकेच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दलाचा (ISF) भाग असणार आहे.