Pakistan Crisis: पाकिस्तानची अडचणी आणखी वाढणार! सेंट्रल बँक उचलणार मोठं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:19 IST2023-02-25T14:19:03+5:302023-02-25T14:19:10+5:30
गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानच्या संकटात आणखी भर पडली आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार काहीही करण्यास तयार असल्याचे दिसत आहे.

Pakistan Crisis: पाकिस्तानची अडचणी आणखी वाढणार! सेंट्रल बँक उचलणार मोठं पाऊल
गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानच्या संकटात आणखी भर पडली आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार काहीही करण्यास तयार असल्याचे दिसत आहे. मदतीसाठी आयएमएफने घातलेल्या कठोर अटीही स्वीकारल्या जात आहेत. दरम्यान, आधीच पाकिस्तानच्या महागाईच्या आगीत जनता होरपळून निघाली आहे. नुकत्याच झालेल्या कराचा मोठा फटका बसल्यानंतर आता पाकिस्तानची सेंट्रल बँक मोठ पाऊल उचलणार आहे.
पाकिस्तानमध्ये व्याजदर वाढवण्याची तयारी केली जात आहे आणि त्यात 20-50 बेसिस पॉईंटने वाढ केली जाऊ शकत नाही, पण पूर्ण 200 बीपीएसने वाढविली जाऊ शकते. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान, पाकिस्तानची मध्यवर्ती बँक, पुढील आठवड्यात ऑफ-सायकल रिव्ह्यूमध्ये व्याजदरात 200 बेस पॉइंट्सने वाढ करण्याची तयारी करत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेजारील देशात सध्याचा व्याजदर 17 टक्के आहे. कमालीच्या महागाईमुळे आधीच पीठ, तेल-गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत आता पुन्हा एकदा देशातील जनतेला मोठा फटका बसणार आहे.
पाकिस्तानची सेंट्रल बँक जी पावले उचलणार आहे, त्यामुळे देशातील लोकांच्या अडचणी वाढणार हे नक्की आहे. पाकिस्तानचा परकीय चलन साठा 3 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचला आहे आणि त्यात सातत्याने घट होत आहे. चीनने पाकिस्तानला 700 डॉलर मिलियनची हमी दिली असली तरी IMF कडून 1.1 बिलियनची मदत अडकली आहे, जी सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अपुरी आहे. पाकिस्तान IMF निधी मिळविण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहे. यामध्ये कर वाढवणे, सबसिडी काढून टाकणे आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. आता व्याजदरात वाढ करण्याचा निर्णयही याच दिशेने टाकलेले पाऊल आहे.
पाकिस्तानमधील आयएमएफचे निवासी प्रतिनिधी एस्थर पेरेझ रुईझ यांनी या पावलाबाबत म्हटले आहे की, जागतिक संघटना पाकिस्तानमधील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आर्थिक धोरणाचा वापर करण्यासही समर्थन देते.
पाकिस्तानातील महागाईचा दर पाहिला तर महागाईचा दर 40 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गॅसपासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंतचे भाव गगनाला भिडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याने 23 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाईने वर्षभराच्या आधारे 41.54% या नवीन उच्चांक गाठला आहे .