पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 10:24 IST2025-04-27T10:24:24+5:302025-04-27T10:24:43+5:30
शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी एलओसीची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रास्त्रे सीमेवर पाठवत आहे.

पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पाणी रोखण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तान गेल्या तीन दिवसांपासून एलओसीवर फायरिंग करत आहे. शिमला करार निलंबित केला आहे, भारताने पाणी बंद करून युद्ध पुकारले आहे, अशा वल्गना करत आहे. दुसरीकडे भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे ठिकाणे उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. सैन्याने उघडलेली मोहीम पाहून पाकिस्तानची तंतरली आहे. यामुळे पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरु झाली आहे.
शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी एलओसीची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रास्त्रे सीमेवर पाठवत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने इमर्जन्सी घोषित केली आहे. सैन्याच्याच नाही तर पीओकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बदल्याही रद्द केल्या आहेत.
झेलम व्हॅलीच्या आरोग्य महासंचालकांनी हे आदेश जारी केले आहेत. या भागातील सर्व हॉस्पिटल आणि आरोग्य टीम यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या ड्युटी पॉईंटवर हजर होण्यास सांगावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी वाहनांच्या खासगी वापरालाही बंदी आणण्यात आली आहे.
भारतीय सैन्याने ९ दहशतवाद्यांची घरे बॉम्ब लावून उध्वस्त केली आहेत. पहलगाम दहशतवाद्याची बहीण या घटनेनंतर एक भाऊ तुरुंगात, दुसरा मुजाहिद्दीन असल्याचे म्हणत आहे. म्हणजे या कुटुंबाची मानसिकताच भारत विरोधी आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी पूर्णपणे बंद करून टाकले आहे. सध्या उन्हाळा असल्याने काश्मीरमधील लोकांना याचा फायदा होणार आहे, शेतीसाठी पाणी मिळणार आहे. परंतू, फार काळ भारत पाकिस्तानचे पाणी रोखू शकणार नाही. कारण त्या प्रमाणात पाणी साठविण्याची यंत्रणा, क्षमता उभारलेली नाहीय. ही यंत्रणा उभारण्यासाठी २० वर्षे लागतील असे अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे.