Blast in Lahore:पाकिस्तानातील लाहोर शहरात चार भीषण स्फोट, 5 ठार तर 20 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 16:32 IST2022-01-20T16:32:10+5:302022-01-20T16:32:28+5:30
Blast in Lahore: स्फोटामुळे दुकाने आणि इमारतींच्या काचा फुटल्या आणि परिसरातील मोटारसायकलींचेही मोठे नुकसान झाले.

Blast in Lahore:पाकिस्तानातील लाहोर शहरात चार भीषण स्फोट, 5 ठार तर 20 जखमी
इस्लामाबाद:पाकिस्तानातील लाहोर शहरात आजय(गुरुवार) 4 भीषण बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय तर 20 पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील लाहोरी गेटजवळ हा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की, घटनास्थळाच्या आजूबाजूच्या दुकाने आणि इमारतींच्या काचा फुटल्या. त्याचबरोबर जवळ उभ्या असलेल्या मोटारसायकलींचेही नुकसान झाले आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी जिओ न्यूजला दिलेल्या माहितीनुसारग, तपास सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र स्फोटामागचे खरे कारण लवकरच कळेल. स्फोटामुळे जमिनीच्या आत दीड फूट खोल खड्डा तयार झाला आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना शहरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटासाठी घटनास्थळी आधीच बॉम्ब पेरण्यात आला होता, अशी पुष्टी पोलिसांनी जिओ न्यूजला दिली आहे. या लाहोरी गेट परिसरात दररोज मोठ्या संख्येने लोक खरेदी-विक्रीसाठी येतात.
परिसराची नाकेबंदी करण्यात आली
स्फोटात जखमी झालेल्या तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मेयो रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या डॉक्टर त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासनाने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले जात आहेत. हा आयईडी होता की टाईम बॉम्ब होता हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान मदतकार्यात गुंतलेले दिसत आहे.