VIDEO: उत्तर देताना महिला पत्रकाराला मारला डोळा; पाक लष्कराच्या प्रवक्त्याचे धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 21:15 IST2025-12-10T21:00:26+5:302025-12-10T21:15:14+5:30
पाक लष्कराच्या प्रवक्त्याच्या बेशिस्तपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO: उत्तर देताना महिला पत्रकाराला मारला डोळा; पाक लष्कराच्या प्रवक्त्याचे धक्कादायक कृत्य
Pakistan Army Spokesperson Viral Video:पाकिस्तानच्या लष्कराचे मीडिया विंग आयएसपीआर चे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान एका महिला पत्रकाराला डोळा मारल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इम्रान खान यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईबद्दल प्रश्न विचारल्यानंतर चौधरी यांनी ही असभ्य कृती केली, ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली आहे. चौधरी यांच्या व्हिडीओवरुन संतापाची लाट उसळली आहे.
पत्रकार अब्सा कोमान यांनी प्रवक्ते चौधरी यांना इम्रान खान यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारला होता. 'हे आरोप मागील आरोपांपेक्षा कसे वेगळे आहेत आणि यापुढे कोणती नवी कारवाई अपेक्षित आहे का?' असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर अहमद शरीफ चौधरी यांनी अत्यंत उपहासात्मक शैलीत उत्तर दिले. "तुम्ही यात एक चौथा मुद्दा जोडा, की ते (इम्रान खान) एक मानसिक रुग्ण देखील आहेत." हे बोलतानाच त्यांनी स्मितहास्य करत महिला पत्रकाराला डोळा मारला.
Shameless. Pakistan Army Spokesperson seen winking at a female journalist during a press conference. In any normal country there would have been a public and media outrage and immediate action by the institution. In Pakistan harassment of women is normal.pic.twitter.com/nFYpcrL3jK
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) December 9, 2025
सोशल मीडियावर संतापाची लाट
अहमद शरीफ चौधरी यांच्या या कृतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी नागरिकांनी आणि युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "हे सर्व कॅमेऱ्यासमोर होत आहे. पाकिस्तानात लोकशाही संपली आहे," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. दुसऱ्या युजरने, "हा देश आता मस्करीचा विषय बनला आहे," असं म्हटलं.
इम्रान खानवर पुन्हा निशाणा
या पत्रकार परिषदेत चौधरी यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी इम्रान खान यांना नारसिसिस्ट म्हटले असून, 'ते सत्तेत नसतील तर जगात काहीही अस्तित्वात राहू नये, असे त्यांना वाटते' असा आरोप केला. तसेच, चौधरी यांनी इम्रान खान यांच्यावर आरोप केला की, जेलमध्ये त्यांची भेट घेणाऱ्या लोकांचा वापर सैन्याविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी केला जात आहे. "पाकिस्तानच्या सेना आणि जनतेमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत, कारण संविधानात अधिकारांसोबत मर्यादाही असतात," असे ते म्हणाले.
लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्याबद्दल इम्रान खान यांनी नुकतेच सोशल मीडियावर ते मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत आणि पाकिस्तानात संविधान व कायद्याचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत' असे विधान केल्यानंतर चौधरी यांनी हे उत्तर दिले आहे.
यापूर्वीही पाकिस्तानी नेत्यांकडून असभ्य कृती
पाकिस्तानमध्ये एखाद्या अधिकारी किंवा नेत्याने सार्वजनिकरित्या महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. १३ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते एका रॅलीदरम्यान महिला पत्रकार शेरी रहमान यांच्यासोबत कथितपणे छेडछाड करताना दिसले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
खुद्द इम्रान खान देखील तीन वर्षांपूर्वी एका कथित ऑडिओ टॅपमुळे वादात सापडले होते. एका महिला पक्षाच्या कार्यकर्त्याशी ते अश्लील संभाषण करत असल्याचा आणि तिला भेटायला बोलावल्याचा आरोप होता. त्यांच्या पक्षाने हे ऑडिओ टेप बनावट असल्याचे म्हटले होते.