खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:36 IST2021-03-15T16:35:45+5:302021-03-15T16:36:35+5:30
पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अशा दयनीय अवस्थेत येऊन ठेपली आहे की आता सामान्य नागरिकांना दोनवेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे.

खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा
Pakistan among biggest importer of arms: पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अशा दयनीय अवस्थेत येऊन ठेपली आहे की आता सामान्य नागरिकांना दोनवेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे. पाकिस्ताननं जगभरातून इतक्या देशांकडून कर्ज घेतलंय की इम्रान खान सरकारला आता देश चालवणं कठीण होऊन बसलं आहे. पण असं असतानाही पाकिस्तानची शस्त्रांची भूक काही भागत नसल्याचं समोर आलं आहे. आशिया खंडात शस्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचं नाव अग्रस्थानी आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूटच्या (एसआयपीआरआय) अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे. या अहवालानुसार २०१६ ते २०२० दरम्यान आशिया खंडातील देशांकडून शस्त्रांची सर्वाधिक आयात झाली आहे. वैश्विक शस्त्र खरेदीबाबत बोलायचं झालं तर आशिया खंड सर्वात मोठी बाजारपेठ आहे. एकूण शस्त्र आयातीपैकी ४२ टक्के शस्त्रांची आयात ही आशिया खंडातील देशांकडूच होते. यात पाकिस्तानचं नाव सर्वात पुढे आहे. त्यानंतर चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची नावं आहेत.
चीनी शस्त्रांवर अवलंबून आहे पाकिस्तान
२०१६ ते २०२० या चार वर्षांमध्ये चीनकडून होण्याऱ्या शस्त्र निर्यातीत घट झाल्याचंही अहवालातून समोर आलं आहे. शस्त्रांच्या निर्यातीत जगात पाचव्या क्रमांवर असलेल्या चीनला गेल्या पाच वर्षांमध्ये मोठा धक्का बसला आहे. २०११ ते १५ आणि २०१६ ते २० यांची तुलना करायची झाल्यास चीनच्या शस्त्र निर्यातीत ७.८० टक्के घट झाली आहे. पाकिस्तान सर्वाधिक चीनी शस्त्रांवर अवलंबून आहे. पाकिस्तान हा देश चीन शस्त्रांचा मोठा ग्राहक मानला जातो. चीन शस्त्रांची खरेदी पाकिस्तान, बांगलादेश आणि अल्जेरियाकडून केली जाते.
भारताने शस्त्रांची आयात केली कमी
'मेक इन इंडिया'च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रांची आयात कमी करण्यावर भर दिला. २०११ ते १५ आणि २०१६ ते २० यांची तुलना केली देशाची शस्त्र आयात तब्बल ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतानं आयात कमी केल्यामुळे सर्वाधिक धक्का रशियाला बसला आहे. कारण भारत रशियाचा शस्त्र खरेदीसाठीचा मोठा ग्राहक आहे. यासोबतच अमेरिकेसोबतची शस्त्र आयातही भारतानं कमी केली आहे. यात तब्बल ४६ टक्क्यांनी आयात कमी केली आहे.