भारताच्या शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानचे तालिबानी हल्लेखोर दोन्ही देशांमध्ये असलेली डुरंड रेषा पार करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. मशीनगन आणि अत्याधुनिक हत्यारांच्या मदतीने तालिबानी हल्लेखोर पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला करत आहेत.
अफगाणिस्तानमधील पूर्व पक्तिका प्रांतामध्ये निर्बंध घालण्यात आलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या तळांवर पाकिस्तानकडून बॉम्बफेक करण्यात आल्यानंतर दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. दरम्यान, आम्ही पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अराजकतावादी तत्त्वांना लक्ष्य करत आहोत, असा दावा तालिबानकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार डुरंड रेषेवर दोन्हीकडून हिंसक चकमकी होत आहेत. तालिबानने पाकिस्तानी सैन्याच्या दोन चौक्यांवर कब्जा केला आहे. तालिबानी सैनिकांनी अवजड हत्यारांचा वापर करून डुरंड रेषेवरील पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्यांना आगीच्या हवाली केले आहे. या चकमकीदरम्यान, पाकिस्तानच्या १९ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर या चौक्या सोडून पळून गेले आहेत.
तालिबानी हल्लेखोर हे गोजगढी, माटा सांगर, कोट राघा आणि तरी मेंगल परिसरात घुसले आहेत, तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. या दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, त्यांनी खुर्रम आणि उत्तर वजिरीस्तानमध्ये धुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत.