"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:59 IST2025-07-30T12:22:33+5:302025-07-30T12:59:19+5:30
हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत असा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला होता. आता या घटनेवर संयुक्त राष्ट्राच्या नव्या रिपोर्टमुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. द रेजिस्टेंस फ्रंट या संघटनेने दोनदा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती आणि हल्ल्याच्या ठिकाणचे फोटोही जारी केले होते. हा हल्ला पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या टीमने म्हटलं आहे.
UNSC मध्ये आयएसआयएल, अलकायदासारख्या दहशतवादी संघटनांवर वॉच ठेवणाऱ्या टीमने ३६ वा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, २२ एप्रिलला ५ दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटनस्थळी हल्ला केला होता. त्याचदिवशी टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि हल्ल्याचे फोटोही जारी केले होते. टीआरएफने दुसऱ्या दिवशीही हल्ल्याची जबाबदारी घेतली. मात्र २६ एप्रिलला टीआरएफने त्यांचा दावा मागे घेतला होता. त्यानंतर टीआरएफने यावर कुठलेही विधान केले नाही, ना इतर कुठल्या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली असं सांगण्यात आले आहे.
तसेच हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत. पहलगामचा हल्ला टीआरएफने केला असंही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर याच महिन्यात अमेरिकेने या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले आहे. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यात २५ भारतीय पर्यटक होते तर १ नेपाळमधील होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले होते.
पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
ऑपरेशन सिंदूर यावर लोकसभेत गेल्या २ दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. केंद्रात यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सरकारांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या चालून आलेल्या संधी गमावल्या. त्यावेळी भारताकडे पाकिस्तानच्या भूभागासह त्याचे सैनिकही ताब्यात होते. पाकिस्तानातून करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांचा रस्ताच भारताने आता बंद केला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो. काँग्रेस पक्ष हा पाकिस्तानच्या रिमोट कंट्रोलवर चालतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ला तमाशा म्हणण्यात आले असा आरोप मोदींनी केला.