Corona New Variant Omicron: पुन्हा सीरम इन्स्टीट्यूट तारणार? नवा व्हेरिअंट काहीच बिघडवू शकणार नाही; या देशाने आधीच तयारी केलेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 16:50 IST2021-11-28T16:47:29+5:302021-11-28T16:50:32+5:30
Corona New Variant Omicron: नव्या कोरोनाच्या व्हेरिअंटवर लस बनविण्यासाठी पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक कंपन्यांनी नवीन लस बनविण्याची तयारी केली आहे.

Corona New Variant Omicron: पुन्हा सीरम इन्स्टीट्यूट तारणार? नवा व्हेरिअंट काहीच बिघडवू शकणार नाही; या देशाने आधीच तयारी केलेली
कोरोनाच्या नव्या खतरनाक व्हेरिअंटने दरवाजा ठोठावला आहे. गेल्या काही दिवसांत या व्हेरिअंटने 11 देशांत प्रवेश केला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लसी या नव्या ओमीक्रॉन व्हेरिअंटवर कितपत प्रभावी आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, ब्रिटन, इस्त्रायलमध्ये दोन डोस किंवा बुस्टर डोसही घेतलेले नागरिक या व्हेरिअंटच्या विळख्यात आले आहेत. यामुळे डब्ल्युएचओसह जग चिंतेत असताना पुन्हा एकदा ब्रिटनने आनंदाची बातमी दिली आहे.
नव्या कोरोनाच्या व्हेरिअंटवर लस बनविण्यासाठी पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक कंपन्यांनी नवीन लस बनविण्याची तयारी केली आहे. रशियाच्या कंपनीने 100 दिवसांत लस बनविण्यात येईल असे म्हटले आहे. अशा या भयाच्या काळात कोव्हिशिल्ड लस बनविणारी ब्रिटनची अॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्डने भविष्यातील हे संकट आधीच ओळखून लस बनविली आहे. कोरोनाच्या सुपर म्युटंट स्ट्रेनविरोधात जबरदस्त सुरक्षा देणारी लस तयार केली असून ती परिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे.
ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझिनेकाच्या लस बनविणाऱ्या टीमने सुपर स्ट्रेनचा एक फॉर्म्युला तयार केला होता. या लसीच्या चाचणीचे परिणाम येत्या काही दिवसांत समोर येणार आहे. जर हा फॉर्म्युला नवीन व्हेरिअंटविरोधात परिणामकारक ठरला तर काही आठवड्यांत पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूटसारख्या कंपन्या व अॅस्ट्राझिनेका मोठ्या प्रमाणावर लस निर्मिती करण्यास सुरुवात करतील. याबाबतची माहिती लसींच्या टास्क फोर्सचे एक सदस्य इम्यूनोलॉजिस्ट प्रोफेसर सर जॉन बेल यांनी दिली आहे.
बेल यांनी आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटला आमच्या सीमेत घुसण्यापासून रोखण्यात आता उशिर झाला असल्याचे मान्य केले आहे. जर सध्याच्या लसी या व्हेरिअंटविरोधात कमी प्रभावी ठरल्या तर नवी लस तातडीने वापरात आणावी लागणार आहे. ब्रिटेन मोठ्या तयारीने या भविष्यातील धोक्यासाठी तयार होता. याचे श्रेय ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझिनेकाच्या टीमलाच द्यावे लागेल. हा फॉर्म्युला आफ्रिकेत याआधी सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटवरून तयार करण्यात आला होता. जो डेल्टाच्या आधीपासून खूप धोकादायक झाला होता.