जगभरात पोहोचला कोरोना; २८०० बळी, ८३००० लोकांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:57 IST2020-02-29T02:35:37+5:302020-02-29T06:57:53+5:30
चीनमध्ये ४४ जणांचा मृत्यू; ‘व्हिसा ऑन अराईव्हल’ सेवा तूर्त बंद

जगभरात पोहोचला कोरोना; २८०० बळी, ८३००० लोकांना संसर्ग
बीजिंग : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात आतापर्यंत २,८०० लोकांचा मृत्यू झाला असून ८३ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. प्रत्येक देशाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये संसर्ग झालेल्या ७८ हजार ८२४ पैकी २,७८८ लोक दगावले आहेत. सर्वाधिक मृतांची संख्या हुवेई प्रांतातील आहेत. हाँगकाँगमध्ये विषाणूबाधित ९२ रुग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गजग्य रोगाला ‘कोविड-१९’ असे नाव दिले आहे.
दक्षिण कोरियात दोन हजार लोकांना संसर्ग
दक्षिण कोरिया शुक्रवारी या विषाणूंचे २५६ नवीन रुग्ण आढळल्याने चीननंतर दक्षिण कोरियात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या २,०२२ वर पोहोचली आहे, असे रोग नियंत्रण व प्रतिबंध विभागाने सांगितले.
सर्वाधिक ९६ टक्के रुग्ण दाएगूमधील आहेत. संसर्गिंत लोकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिनचेंगजी चर्च ऑफ जीससच्या २ लाख १० हजारांहून अधिक सदस्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कोरियात या विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी निम्मे लोक या चर्चशी संबंधित असल्याचे या रोगाचे हे केंद्रस्थान मानले जात आहे.
चीनमध्ये नवे ३२७ रुग्ण
चीनमध्ये या जीवघेण्या संसर्गजन्य रोगाने शुक्रवारी ४४ जणांचा मृत्यू झाला असून ३२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक प्रादुर्भाव हुवेई प्रांतात झाला असून चीनमध्ये एकूण ७८ हजार ८२४ लोकांना संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाची साथ निर्णायक वळणावर असल्याचा इशारा दिलेला आहे. विषाणूग्रस्त देशातून चीनला येणाºया लोकांना १४ दिवस एकातांत ठेवण्याचा आदेश चीन सरकारने दिला आहे.
जगाच्या पाठीवरील रुग्णांची संख्या
जपानमध्ये क्रूझ जहाजावरील ७०५ जणांसह ९१८ लोकांना संसर्ग झाला असून ८ जण मरण पावले आहेत. इटलीत विषाणूबाधितांची संख्या ६५० असून आतापर्यंत येथे ८ जणांचा बळी गेला आहे. इराणमध्येही २६ जणांचा मृत्यू झाला असून २५४ रुग्ण आहेत.
सिंगापूरमध्ये ९६ रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत ६०, कुवैतमध्ये ४३, थायलँडमध्ये ४९, बहरीन ३३ रुग्ण आढळले आहेत. तैवानमध्ये एकाचा मृत्यू झाला असून ३२ जणांना संसर्ग झाला आहे.