पाकिस्तानचा तीळपापड; अमेरिकेतील विमानतळावर पाक पंतप्रधानांना कपडे काढायला लावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 11:03 IST2018-03-28T07:48:44+5:302018-03-28T11:03:00+5:30
अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील बिघडत असलेल्या संबंधांच्यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना जॉन एफ कॅनेडी एअरपोर्टवर कडेकोट सुरक्षा तपासणीतून जावं लागलं.

पाकिस्तानचा तीळपापड; अमेरिकेतील विमानतळावर पाक पंतप्रधानांना कपडे काढायला लावले!
न्यू-यॉर्क - अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील बिघडत असलेल्या संबंधांच्यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अमेरिकेमध्ये अपमानकारक वागणूक मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी अमेरिकेच्या दौ-यावर होते. यावेळी जॉन एफ कॅनेडी एअरपोर्टवर अब्बासी यांना कडेकोट सुरक्षा तपासणीतून जावं लागलं. या तपासणीदरम्यान त्यांना अपमानकारक वागणुकींचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये जॉन एफ कॅनेडी एअरपोर्टवर पाक पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांची सर्वसामान्य जनतेप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प सरकारकडून पाकिस्तानवर व्हिसा बंदी लागू करण्याचे विचारविनिमय सुरू असताना हा व्हिडीओ समोर आला आहे. यावर पाकिस्ताननं संताप व्यक्त केला आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सरकारमधील अधिका-यांवर अन्य प्रकारचे कठोर निर्बंधही लादले जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाक पंतप्रधान अब्बासी आपल्या आजारी बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. अब्बासी यांना मिळालेल्या अपमानकारक वागणुकीसंदर्भात पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचं असे म्हणणं आहे की,''देशाच्या पंतप्रधानांकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे व अशा खासगी दौ-यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू त्यांच्याजवळ नसतात. त्यामुळे अशापद्धतीनं तपासणी होणे हा देशाचा अपमान आहे''.
Pakistan PM Shahid Khaqan Abbasi frisked during security procedure at JFK airport in New York: Pak media #USApic.twitter.com/u1NuG0bnNl
— ANI (@ANI) March 28, 2018