ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 05:19 IST2025-12-14T05:18:50+5:302025-12-14T05:19:03+5:30
संसदेतील तीन प्रभावशाली सदस्यांची मागणी; टॅरिफचा तोटा अमेरिकेलाच

ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय रद्द करावा, अशा मागणीचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत 'काँग्रेस'मध्ये तीन प्रभावशाली काँग्रेस सदस्यांनी शुक्रवारी सादर केला. अशा वाढीव टॅरिफमुळे अमेरिकेवर विपरीत परिणाम होईल आणि भारत-अमेरिका संबंध कमकुवत होतील, अशी भीती या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
या सदस्यांची नावे डेबोरा रॉस, मार्क वेसी आणि राजा कृष्णमूर्ती अशी असून या तिघांनी भारतावर लावण्यात आलेले ५० टक्के टॅरिफ रद्द केल्यास व्यापारावरील संसदेचा घटनात्मक अधिकार पुन्हा प्रस्थापित होईल, अशीही आशा व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासनाने 'आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार अधिनियमांतर्गत' भारतीय वस्तूंवर व्यापक शुल्क लावले होते. तसेच राष्ट्रीय आणीबाणी आदेशही लागू करण्यात आला होता. तोही रद्द करण्याची मागणी या सदस्यांनी केली आहे.
राजा कृष्णमूर्ती म्हणाले, "अमेरिकेच्या हितांना प्रोत्साहन देण्याऐवजी, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे आणि ग्राहक महागड्या दरात वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जात आहेत. जर हे शुल्क रद्द झाले, तर अमेरिका आर्थिक व सुरक्षेसह अनेक मुद्द्यांवर भारताशी आपली चर्चा पुढे नेऊ शकेल."
प्रस्तावातील हे आहेत महत्त्वाचे मुद्दे
टॅरिफमध्ये वाढ केल्याने अमेरिकेचे हित साधण्याऐवजी त्याने शुल्क पुरवठा साखळीत अडथळा निर्माण होऊन अमेरिकेची भारताशी असलेली पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. टॅरिफमुळे अमेरिकेच्या उद्योगांचे नुकसान व ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. टैरिफ रद्द केल्यास अमेरिकेला भारताशी आर्थिक, सामाजिक क्षेत्रात बरीच प्रगती करता येईल. उत्तर कॅरोलिनासारखी राज्ये भारतीय वस्तूंच्या व्यापाराशी अनेक वर्षांपासून जोडली गेली आहेत. येथे भारतीय गुंतवणूकही आहे. त्यांच्यावर परिणाम होताना दिसत आहे.
ट्रम्प यांची मध्यस्थी निष्फळ; थायलंड-कंबोडियात संघर्ष, कंबोडियाच्या ७ ठिकाणांवर थायलंडचे बॉम्ब हल्ले
सुरीन (थायलंड) : थायलंड व कंबोडियामध्ये युद्धविराम घडवून आणण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा प्रयत्न निष्फळ ठरला. शनिवारी सकाळीच थायलंड व कंबोडियामध्ये पुन्हा संघर्ष उफाळला. थायलंडच्या 'एफ-१५' लढाऊ विमानांनी कंबोडियातील सात ठिकाणांवर बॉम्ब हल्ले केले.
पुरसट प्रांतावर केलेल्या हल्ल्यात दोन हॉटेल जमीनदोस्त झाल्याचे कंबोडियाचे म्हणणे आहे. कंबोडियाने या हल्ल्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. थायलंडच्या या हल्ल्याला कंबोडियाने प्रत्युत्तरही दिले. या संघर्षांत थायलंडने आपले चार सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. गेल्या जुलै महिन्यात ट्रम्प यांनी टॅरिफची धमकी देत दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला होता.
ट्रम्प यांच्या दाव्यावर दोन्ही देशांच्या प्रमुखांचे मौन; युद्धविराम काही तासांतच मोडला, पुन्हा हल्ले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी थायलंड आणि कंबोडियाच्या प्रमुखांशी आपले फोनवरून बोलणे झाले असून दोघेही युद्धविरामासाठी सहमत झाले, अशी सोशल मीडियावर घोषणा केली. पण काही तासांतच हा युद्धविराम दोन्ही देशांनी मोडला. ट्रम्प यांच्या या घोषणेवर थायलंड आणि कंबोडियाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.