Operation Sindoor: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने दावा करतात की, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली. मात्र, भारताने प्रत्येकवेळी त्यांचा दावा खोडून काढला आहे. अशातच, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी स्वतः मान्य केले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धविरामाचा प्रस्ताव अमेरिकेमार्फत आला होता, मात्र भारताने तो मान्य केला नव्हता. डार यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानने भारताशी संवाद साधण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आणि पुढेही संवादासाठी तयार आहे.
ट्रम्पच्या दाव्याची पाकिस्तानकडून पोलखोल
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करण्याचा दावा केला होता. यावर मंत्री डार यांनी सांगितले की, भारताने कधीही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला संमती दिली नाही. त्यांनी असेही म्हटले की, जेव्हा पाकिस्तानने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना ट्रम्प यांच्या मध्यस्थतेबद्दल विचारले, तेव्हा रुबियो यांनी स्पष्ट केले की, भारत नेहमीच हा विषय द्विपक्षीय मुद्दा असल्याचे म्हणत आला आहे.
रुबियोसोबतची चर्चा
इशाक डार यांनी सांगितले की, 10 मे रोजी सकाळी 8:17 वाजता रुबियो यांनी त्यांना सांगितले होते की, भारत-पाकिस्तानमध्ये लवकरच तटस्थ ठिकाणी चर्चा होईल. परंतु 25 जुलैला वॉशिंग्टनमध्ये झालेल्या पुढील भेटीत रुबियो यांनी कळवले की, भारताने या विषयाला फक्त द्विपक्षीय मुद्दा मानले असून तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला नकार दिला आहे. जेव्हा रुबियोमार्फत युद्धविरामाचा प्रस्ताव आला होता, तेव्हा आम्हाला विश्वास दिला गेला होता की, भारताशी संवाद होईल. मात्र नंतर सांगण्यात आले की, भारताने नकार दिला आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तानची द्विपक्षीय चर्चेला हरकत नाही, पण ती चर्चा व्यापक असायला हवी. यामध्ये दहशतवाद, व्यापार, अर्थव्यवस्था, जम्मू-काश्मीर आणि इतर सर्व मुद्यांचा समावेश असायला हवा. आम्ही कोणत्याही गोष्टीची भीक मागत नाही. जर एखाद्या देशाला चर्चा करायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू. आम्ही शांतताप्रिय राष्ट्र आहोत आणि आमचा विश्वास आहे की, संवाद हाच पुढचा मार्ग आहे. मात्र चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून तयारी हवी. भारताला जर चर्चा करायचीच नसेल, तर मग ती होणार नाही, असेही डार म्हणाले. त्यांच्या या दाव्यावरुन हे परत एकदा स्पष्ट झाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाक युद्धात मध्यस्थी केली नाही.
ट्रम्प यांनी ३० हून अधिक वेळा युद्धविरामाचे श्रेय घेतले
२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात २६ जण ठार झाले. १५ दिवसांनंतर, ७ मे रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. दोन्ही देशांमधील संघर्ष ४ दिवस चालला, त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाला. मात्र, तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० हून अधिक वेळा युद्धविरामाचे श्रेय घेतले आहे. मात्र, भारताने प्रत्येकवेळी स्पष्टपणे म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील युद्धविराम पाकिस्तानच्या विनंतीवरुन झाला आहे, त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नाही.