नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यातील निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. मध्यरात्री १ च्या सुमारास सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यात कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा झाला आहे. अजहरच्या कुटुंबातील १४ लोकांना यमसदनी धाडण्यात सैन्य दलाला मोठे यश आले आहे. अजहरच्या घरावर हल्ला झाला. या हल्ल्यात मसूद अजहर मारला गेला की नाही याबाबत स्पष्टता नाही. पाक माध्यमांनी ही बातमी समोर आणली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यात मसूदच्या दहशतवादी तळालाही उद्ध्वस्त केले आहे. त्यात दहशतवादी मसूदचा भाऊ रऊफ अजहर गंभीर जखमी झाला आहे. तर मृतांमध्ये मसूद अजहरचा आणखी एक भाऊ आणि भारतातील मॉस्ट वाँटेड दहशतवादी रऊफ अजहरचा मुलगा हुजैफा याचा समावेश आहे. रऊफची बायकोही हल्ल्यात ठार झाली आहे.
कोण आहे मसूद अजहर?
मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मॉस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे. मसूद अजहरला १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या हायजॅक केल्याप्रकरणी अटक केले होते. त्यानंतर बंधक नागरिकांच्या सुटकेसाठी त्याला सोडण्यात आले. त्यानंतर तो पाकिस्तान लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. २००१ साली मसूद अजहरच्या नेतृत्वात जैश ए मोहम्मदने भारतीय संसदेवर हल्ला केला होता. २००० मध्ये जम्मू काश्मीर विधानसभा, २०१६ साली पठाणकोट एअरबेस आणि २०१९ साली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने मसूद अजहरच्या दहशतवादी ठिकाणांवर मिसाईल हल्ला केला. ज्यात बहावलपूर इथल्या त्याच्या मदरसा आणि जैशच्या मुख्यालयाला टार्गेट करण्यात आले. हा हल्ला २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला. मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने २०१९ साली जागतिक दहशतवादी घोषित केले होते. तो अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग देतो.