ऑलिम्पियन धावपटू टायसनच्या मुलीचा गोळी लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 15:16 IST2016-10-17T10:32:38+5:302016-10-17T15:16:00+5:30
ऑलिम्पियन धावपटू टायसन गे याच्या 15 वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. टायसनचा एजंट आणि पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे

ऑलिम्पियन धावपटू टायसनच्या मुलीचा गोळी लागून मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
लेंग्जिंग्टन, दि. 17 - ऑलिम्पियन धावपटू टायसन गे याच्या 15 वर्षीय मुलीचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. टायसनचा एजंट आणि पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे. गोळीबार करणा-यांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केंटुकी येथे झालेल्या गोळीबारात मानेवर लागलेल्या गोळीमुळे टायसन याची मुलगी ट्रिनिटी हिचा मृत्यू झाला आहे.
पहाटे चार वाजता युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकीजवळ एका रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये फायरिंग झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन वाहनांदरम्यान ही फायरिंग चालू होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी ट्रिनिटी त्याठिकाणी मृतावस्थेत आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा मृत्यू झाला होता.
चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून एक गाडी जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. फायरिंग झालेल्यांपैकी एका गाडीत ट्रिनिटी होती का याचाही पोलीस तपास करत आहेत. टायसन गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. 2012 लंडन ऑलिम्पिकमधील 4x100 मी रिले स्पर्धा जिंकणा-या टीममध्ये तो सहभागी होता. 2013 मध्ये स्टेरॉईट घेतल्याच्या आरोपात दोषी आढळल्याने त्याच्याकडील पदक काढून घेण्यात आलं होतं.