नापाक! संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादावरून भारतानं पाकची केली गोची, पाकनं उपस्थित केला कुलभूषण जाधवांचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 12:57 IST2018-01-21T08:27:24+5:302018-01-21T12:57:09+5:30
कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

नापाक! संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादावरून भारतानं पाकची केली गोची, पाकनं उपस्थित केला कुलभूषण जाधवांचा मुद्दा
संयुक्त राष्ट्रे - कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तानने दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनल्यावरून पाकिस्तानची खरडपट्टी काढली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचा मुद्दा उपस्थित करून स्वत:चेच हसे करून घेतले.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानसमोर असलेल्या आव्हानांबाबत चर्चा झाली. त्या देशाला प्रामुख्याने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे साहजिकच चर्चेच्या ओघात पाकिस्तानवर निशाणा साधण्यात आला. भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रांमधील दूत सय्यद अकबरूद्दीन यांनी मांडली. दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने उद्धवस्त करण्यावर पाकिस्तानने लक्ष केंद्रित करावे. तसेच, चांगले आणि वाईट दहशतवादी असा भेद करणारी मानसिकता पाकिस्तानने बदलावी, असे ते म्हणाले. त्यामुळे पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. अशातच पाकिस्तान दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनल्याच्या भारताच्या भूमिकेची री अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांनीही ओढली.
त्यामुळे पाकिस्तानची आणखीच गोची झाली. पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी त्यांच्या देशात दहशतवाद्यांना कुठलेही सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध होत नसल्याची हास्यास्पद बाजू मांडली. अर्थात, ती कुणालाच पटण्याची शक्यता नव्हती. सुरक्षा परिषदेत दोन डझनहून अधिक देशांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली. मात्र, कुणीच पाकिस्तानच्या बाजूला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे फजिती झालेल्या लोधींनी जाधव यांचा मुद्दा उपस्थित केला.
मानसिकता बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी (भारत) आत्मपरीक्षण करावे. अशी भाषा करणारेच विध्वंसक कारवाया करत आहेत. भारतीय हेराच्या (जाधव) अटकेवरून ते सिद्ध झाले आहे, असे त्या म्हणाल्या. संबंधित वक्तव्य करून त्यांनी स्वदेशाचेच (पाकिस्तान) हसे करून घेतले. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असणाऱ्या जाधव यांना हेरगिरीच्या खोट्या आरोपात पाकिस्तानने अडकवले आहे. त्यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षाही ठोठावली. मात्र, या शिक्षेच्या अमंलबजावणीला स्थगिती देऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला याआधीच जोरदार चपराक लगावली आहे.