पनामा सिटी : अमेरिकी देशांच्या ऐतिहासिक शिखर परिषदेत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांनी शनिवारी हस्तांदोलन केले. शेजारी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून उपस्थित होते. उभय देशातील द्विपक्षीय संबंध १९६१ मध्ये खंडित झाले होते. तब्बल ५० वर्षांच्या खंडानंतर ओबामा व कॅस्ट्रो यांनी अलीकडेच ही कटुता दूर करण्याच्या दिशेने पावले उचलली असून उभय नेत्यांचे आजचे हस्तांदोलन मुत्सद्दी संबंधांच्या दृष्टिकोनातून नव्या आरंभाचे प्रतीक बनले आहे. यापूर्वी ओबामा आणि कॅस्ट्रो यांनी २०१३ मध्ये नेल्सन मंडेला यांच्या अंत्यविधीदरम्यान हस्तांदोलन केले होते. उभय नेत्यांमध्ये आजच व्यापक चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शिखर परिषदेत बोलताना ओबामा यांनी अमेरिका लॅटीन अमेरिकी देशांच्या व्यवहारांत यापुढे हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)
ओबामा-कॅस्ट्रोंचे हस्तांदोलन
By admin | Updated: April 12, 2015 01:13 IST