नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:47 IST2025-07-17T13:47:08+5:302025-07-17T13:47:30+5:30

Nimisha Priya : तलाल महदीचा भाऊ अब्देल फताह महदी याने फाशी पुढे ढकलण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Nurse Nimisha Priya's hanging temporarily stayed, but deceased Talal's brother Aikechana! Now he said... | नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...

नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...

येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेली केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिच्या फाशीची अंमलबजावणी काल, बुधवारी (१६ जुलै) पुढे ढकलण्यात आली असली, तरी तिच्या सुटकेची शक्यता अजूनही अंधारात आहे. येमेनी नागरिक तलाल अब्दो महदी याच्या हत्येप्रकरणी निमिषाला दोषी ठरवण्यात आले आहे.

तलाल महदीचा भाऊ अब्देल फताह महदी याने फाशी पुढे ढकलण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "आमचं कुटुंब कोणत्याही परिस्थितीत समेट करायला तयार नाही," असं तो म्हणाला. "या प्रकरणात मध्यस्थीचे अनेक प्रयत्न झाले, दबावही आणला गेला, पण आमची मागणी स्पष्ट आहे. आम्हाला बदलाच हवा!" असं त्याने ठामपणे सांगितलं.

शेवटच्या क्षणी वाचले प्राण, पण मार्ग अजूनही कठीण!

निमिषाला १६ जुलै रोजी फाशी देण्याची घोषणा केली होती, पण केरळमधील एका प्रमुख मुस्लिम धर्मगुरूच्या हस्तक्षेपामुळे शेवटच्या क्षणी फाशी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली. या धर्मगुरूंनी येमेनमधील प्रभावशाली सूफी धर्मगुरूंशी संपर्क साधला, ज्यांनी येमेनी अधिकाऱ्यांशी आणि महदीच्या कुटुंबाशी बोलणी केली. यामुळे निमिषाच्या कुटुंबाला ब्लड मनीच्या बदल्यात माफीसाठी वाटाघाटी करायला वेळ मिळाला आहे.

मात्र, महदीच्या भावाची कठोर भूमिका पाहता, कुटुंब ब्लड मनी घेण्यास सहमत होईल की नाही, हे अद्याप निश्चित नाही. "रक्त विकत घेता येत नाही, न्याय विसरला जाणार नाही," असं म्हणत तलालच्या भावाने निमिषाला फाशी देण्याची शपथ घेतली आहे.

काय आहे निमिषा प्रिया प्रकरण?

२००८ मध्ये नर्स म्हणून येमेनला गेलेल्या निमिषाने २०११ मध्ये लग्न केले. तिचा पती २०१४ मध्ये भारतात परतला. २०१४ मध्ये निमिषाने तलाल अब्दो महदीसोबत भागीदारीत स्वतःचे क्लिनिक उघडले. निमिषाच्या कुटुंबियांच्या मते, महदीने तिचे शारीरिक आणि आर्थिक शोषण करायला सुरुवात केली, तिचा पासपोर्ट काढून घेतला आणि तिला जबरदस्तीने आपल्यासोबत ठेवले.

जुलै २०१७ मध्ये, महदीला बेशुद्ध करण्यासाठी दिलेल्या औषधांचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर निमिषाने दुसऱ्या नर्सच्या मदतीने महदीचे शरीर तुकडे करून एका टाकीत टाकले. एका महिन्यानंतर तिला सौदी-येमेन सीमेवर पकडण्यात आले.

येमेनमध्ये हुथी बंडखोरांचे वर्चस्व असल्याने भारताचे तिथे औपचारिक संबंध नाहीत, ज्यामुळे महदीच्या कुटुंबाशी बोलण्यात अडचणी येत आहेत. निमिषाच्या फाशीला तात्पुरती स्थगिती मिळाली असली तरी, महदीच्या कुटुंबाचा रोष आणि 'बदल्याची' मागणी पाहता निमिषाचे भवितव्य अजूनही अनिश्चित आहे.

Web Title: Nurse Nimisha Priya's hanging temporarily stayed, but deceased Talal's brother Aikechana! Now he said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.