आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:16 IST2025-11-04T12:15:57+5:302025-11-04T12:16:37+5:30
Donald Trump News: यावर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी जगभरातील अनेक संघर्षांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिका आता आणखी एका ठिकाणी युद्धाची आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी
यावर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी जगभरातील अनेक संघर्षांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिका आता आणखी एका ठिकाणी युद्धाची आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना उघड धमकी देताना राष्ट्रपती म्हणून मोजकेच दिवस उरले आहेत, असा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, निकोलस माडुरो यांचं सरकार हे अमेरिकेमध्ये ड्रग्स आणि गुन्हेगारीसाठी एक माध्यम बनले आहे. एवढंच नाही तर हे सरकार व्हेनेझुएलामधील लोकांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थलांतरासाठीही जबाबदार आहे.एकीकडे अमेरिकेने कॅरेबिनय देशांमध्ये आपल्या सर्वात मोठ्या लष्करी तळाच्या आधुनिकीकरणाचं काम ३५ वर्षांनंतर हाती घेतलं असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, ते आमच्यासोबत खूप वाईट वर्तन करत आहेत. केवळ ड्रग्स प्रकरणातच नाही तर त्यांनी आमच्या देशामध्ये आम्हाला नको असलेल्या लाखो लोकांना पाठवलं आहे. त्यांनी त्यांच्या देशातील तुरुंग आमच्या देशात रिकामे केले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्याकडील मानसोपचार केंद्रं आणि वेड्यांच्या रुग्णालयेही आमच्या अमेरिकेत आणून रिकामी केली आहेत.
दरम्यान, सध्या अमेरिकन सैन्यदले कॅरेबियन बेटांवर असलेल्या आपल्या नौदल तळाचं आधुनिकीकरण करत आहे. तसेच तिथे सातत्याने लष्करी मोहिमांची तयारीही सुरू आहे. यामधून अमेरिका व्हेनेझुएलामध्ये संभाव्य सैनिकी कारवाई करू शकते, असे संकेत मिळत आहेत.