आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:38 IST2025-11-04T17:32:10+5:302025-11-04T17:38:54+5:30
Smoking Banned : सेलिब्रिटी वर्गात लोकप्रिय असलेल्या या देशात आता धूम्रपानावर मोठा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
धूम्रपानामुळे नुकसान होते, असा सूचना वारंवार कानावर पडत असताना, डोळ्यांना दिसत असताना देखील काही लोकांची सवय मात्र सुटत नाही. कितीही नियम लागू केले तरी, लोक त्याचे उल्लंघन करताना दिसतात. मात्र, या विरोधात आता एका देशाने कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. सेलिब्रिटी वर्गात लोकप्रिय असलेल्या या देशात आता धूम्रपानावर मोठा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. मालदीव या देशाने हे कठोर नियम आपल्या देशात लागू केले आहेत. धूम्रपान करण्याविषयी हे नियम केवळ देशातील नागरिकांनाच नाही, तर देश फिरायला येणाऱ्या पर्यटकांनाही लागू होणार आहेत.
शनिवारपासून मालदीवमध्ये धूम्रपानावर नवीन बंदी लागू करण्यात आली आहे. या धूम्रपान बंदी अंतर्गत, जानेवारी २००७नंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखू उत्पादने खरेदी, वापर किंवा विक्री करण्याची परवानगी असणार नाही. या निर्णयामुळे मालदीव तंबाखूवर कठोर बंदी लादणारा जगातील पहिला देश बनला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नियम केवळ देशातील नागरिकांनाच लागू होणार नाही, तर मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही लागू होईल. याचा अर्थ असा की, जर तुमचा जन्म २००७ नंतर झाला असेल आणि तुम्ही मालदीवला भेट देत असाल, तर तुम्ही या देशात धूम्रपान करू शकणार नाही.
१ नोव्हेंबरपासून 'हे' नियम लागू
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी सुरू केलेले हे धोरण १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे आणि तंबाखूमुक्त पिढीला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ही बंदी सर्व प्रकारच्या तंबाखूंना लागू आहे आणि दुकानदारांना ते विकण्यापूर्वी खरेदीदारांचे वय पडताळणे आवश्यक असणार आहे.
दंड किती असेल?
मालदीवमध्ये आधीच वया पुरावा न तपासता ई-सिगारेट आणि व्हेपिंग उत्पादनांच्या आयात, विक्री, वितरण, ताब्यात ठेवणे आणि वापरावर पूर्ण बंदी आहे. अल्पवयीन व्यक्तीला तंबाखू विकल्यास ५०,००० रुफिया (अंदाजे २९००० रुपये) दंड आणि व्हेपिंग डिव्हाइस वापरल्यास ५,००० रुफिया (अंदाजे २९०० रुपये) दंडाची शिक्षा आहे.
यापूर्वीही लागू केले गेलेत असे कायदे
याआधीही असे अनेक कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत, परंतु त्यापैकी एकही अंमलात आणण्यात आलेला नाही. न्यूझीलंडच्या २००२च्या कायद्यात १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखू विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव होता. तो २०२४ मध्ये लागू होणार होता, परंतु कर कपातीसाठी निधी देण्यासाठी एक वर्ष आधीच मागे घेण्यात आला.
युनायटेड किंग्डममध्येही असेच कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत, परंतु ते कधीही मंजूर झाले नाहीत. १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्यांसाठी तंबाखूवर बंदी घालण्याचे आणि तंबाखू आणि व्हेपिंग उत्पादनांच्या विक्रीवरील नियम कडक करण्याचे आश्वासन एका नवीन विधेयकात देण्यात आले आहे. हे विधेयक सध्या संसदेत मंजूर होण्याच्या प्रक्रियेत आहे.