भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या कारवाईमुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं असतानाच आता लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी सैफुल्ला खालिद याला अज्ञात हल्लेखोरांनी ठार मारलं आहे. सैफुल्लाह खालिद हा नेपाळमधून भारतविरोधी कारवाया करण्यात सक्रिय होता. तसेच भारतात झालेल्या तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता.
सैफुल्लाह खालिद हा लष्कर एक तोयबाचा एक ऑपरेटिव्ह होता. लष्कर ए तोयबाने भारतात हल्ले करण्याचं टास्क त्याला दिलं होतं. त्यानंतर त्याने नेपाळमध्ये आपला अड्डा तयार करून भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. मात्र भारतातील गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर तो नेपाळमधून पळून पाकिस्तानमध्ये जाऊन लपला होता. तो भारताला हव्या असलेल्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक होता.
सैफुल्लाह हा वेगवेगळ्या नावांनी नेपाळमधून दहशतवादी कारवाया घडवून आणत होता. अखेर आज अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानमध्ये त्याला गोळ्या झाडून ठार मारले.भारतात झालेल्या तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागे सैफुल्लाहचा हात असल्याचे समोर आले होते. सैफुल्लाहने २००६ साली नागपूरमधील आरएसएसच्या मुख्यालयावर हल्ला घडवून आणला होता. २००१ मध्ये रामपूरमधील सीआरपीएफच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यामागेही त्याचा हात होता. तसेच २००५ मध्ये त्याने बंगळुरूमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला होता.