युद्धासाठी तयार, उत्तर कोरियाची अमेरिकेला खुली धमकी
By Admin | Updated: April 12, 2017 21:40 IST2017-04-12T15:27:44+5:302017-04-12T21:40:49+5:30
उत्तर कोरियानं अमेरिकेला खुल्या युद्धाचं आव्हान दिलं आहे.

युद्धासाठी तयार, उत्तर कोरियाची अमेरिकेला खुली धमकी
ऑनलाइन लोकमत
सोल, दि. 12 - उत्तर कोरियानं अमेरिकेला खुल्या युद्धाचं आव्हान दिलं आहे. तसेच अमेरिकेकडून कोरिया द्विपावर नौसैनिक तैनात करण्यात आल्यानं उत्तर कोरियानं याचा निषेध व्यक्त केला आहे. युद्धासाठी भडकावल्यास अमेरिकेवर आण्विक हल्ला करू, असंही उत्तर कोरियानं ठणकावलं आहे.
उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, अमेरिकेनं उत्तर कोरियावर हल्ला करण्यासाठी घाईघाईत जे पाऊल उचललं आहे, तो एका गंभीर स्थितीत घेऊन जाणारं आहे. अमेरिकेला जसं युद्ध अपेक्षित आहे, तसं युद्धच त्यांना मिळेल, तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावरील मिसाइल हल्ल्यानंतर स्वतःच्या सल्लागारांना प्योंगयांगवर वचक ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. चीन उत्तर कोरियाला आण्विक शस्त्रास्त्र पुरवण्याचा कार्यक्रम थांबवणार नसल्यास अमेरिका उत्तर कोरियावर एकपक्षीय कारवाई करेल, असाही इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता.
तत्पूर्वी अमेरिकेनं कार्ल विन्सन युद्धनौका उत्तर कोरियाला लगाम घालण्यासाठी प्रशांत महासागरात सज्ज केली आहे, असे पॅसिफिक कमांडचे प्रवक्ते कमांडर डेव्ह बेनहॅम यांनी सांगितले होते. उत्तर कोरिया या भागाला मोठी हानी पोहोचवू शकतो, उत्तर कोरियानं याच समुद्रात क्षेपणास्त्र चाचण्या केल्या असून, तो बेजबाबदार देश असल्याचंही अमेरिकेचं मत आहे.
यूएसएस कार्ल विन्सन ही विमानवाहू युद्धनौका असून, ती आता सिंगापूरकडून पश्चिम प्रशांत महासागरात तैनात करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने आतापर्यंत क्षेपणास्त्र कार्यक्रम अरेरावीने पुढे नेला असून, अमेरिकेवर हा देश अण्वस्त्राचा वापर करील, अशी ट्रम्प यांना भीती आहे. उत्तर कोरियाने आतापर्यंत पाच अणुचाचण्या केल्या आहेत. काही अहवालांनुसार उत्तर कोरिया सहावी अणुचाचणी करण्याच्या तयारीत असून, येत्या दोन वर्षांत अणुबॉम्ब बनवण्याच्या क्षमतेत वाढ करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने जपानच्या सागरात आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. फेब्रुवारी महिन्यात उत्तर कोरियानं लागोपाठ चार आंतरखंडीय क्षेपणास्त्रे पूर्व किनाऱ्यावर सोडली होती, त्यातील तीन जपानच्या अगदी जवळ पडली. गेल्या ऑगस्टमध्ये त्यांनी पाणबुडीतून आंतरखंडीय क्षेपणास्त्र सोडले ते जपानच्या दिशेने 500 किमी अंतर कापत गेले असल्यानं जपानही सतर्क झाला आहे.