उत्तर कोरियाने काढली खोडी; जपानमध्ये अलर्ट, ट्रेन थांबल्या; पुन्हा तीन क्षेपणास्त्रे डागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 12:08 IST2022-11-04T12:08:29+5:302022-11-04T12:08:54+5:30
गुरुवारीही पुन्हा तीन क्षेपणास्त्रे डागली

उत्तर कोरियाने काढली खोडी; जपानमध्ये अलर्ट, ट्रेन थांबल्या; पुन्हा तीन क्षेपणास्त्रे डागली
सेऊल : उत्तर कोरियाने बुधवारी २३ क्षेपणास्त्रे डागून तणाव निर्माण केल्यांतर गुरुवारीही किमान तीन क्षेपणास्त्रे डागली. त्यातील एक आंंतरखंडीय क्षेपणास्त्र असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे जपानी सरकारला नजीकच्या भागातील नागरिकांना इतरत्र हलविण्याचा अलर्ट जारी करावा लागला, तसेच रेल्वेही काही काळ थांबवाव्या लागल्या. गुरुवारच्या घटनेबाबत दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर कोरियाने सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी राजधानी प्योंगयांगजवळील भागातून आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर एका तासानंतर जवळच्या काचेऑन शहरातून दोन कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा केला. क्षेपणास्त्र ७५० किलोमीटरवर पडले.
जपानचे संरक्षण मंत्री यासुकाझू हमादा म्हणाले की, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांपैकी एकाने २ हजार किलोमीटर कमाल उंची गाठली आणि ते सुमारे ७५० किलोमीटरवर पडले. जपानी सरकारला सुरुवातीला हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र उत्तरेकडील प्रदेशावरून जाऊ शकते अशी भीती होती, परंतु नंतर तो धोका टळला. क्षेपणास्त्राच्या इशाऱ्यानंतर जवळील भागातील बुलेट ट्रेन सेवा थोडा वेळ थांबवून पुन्हा सुरू करण्यात आली होती. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी उत्तर कोरियाच्या या प्रक्षेपणाचा निषेध केला आणि परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.