न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. व्हॉईट हाऊसमधील ‘ओव्हल ऑफिस’मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. अमेरिकेने भारताविरुद्ध ५० टक्के टॅरिफ लावल्यामुळे आता दोन्ही देशांतील व्यापार वाटाघाटी गतिमान होतील का, या प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, ‘अजिबात नाही. जोपर्यंत हा मुद्दा (टॅरिफ) सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही वाटाघाटी होणार नाहीत.’
ट्रम्प यांनी आधी २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. ७ ऑगस्टपासून ते लागूही झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी अजून २५ टक्के टॅरिफ लावले. त्यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्के झाले आहे.
अन्यायकारक, अनुचित : भारतभारतीय वस्तूंवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक, अनुचित आणि अयोग्य आहे. भारत राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.