कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:50 IST2025-07-21T14:49:31+5:302025-07-21T14:50:18+5:30
Donald Trump shares Barak Obama Video: एखाद्या राष्ट्राध्यक्षाने माजी राष्ट्राध्यक्षाबाबतचा असा व्हिडीओ पोस्ट करणे हे धोकादायक मानले जात आहे.

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
अमेरिकेत सध्या रिव्हेंज पॉलिटिक्स सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एफबीआयचे एजंट अटक करतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. समोर ट्रम्प बसलेले असून ते हसत आहेत, तर ओबामांना अमेरिकेत गुन्हेगारांना पकडतात तसे खाली पाडले जात असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ जरी एआय जनरेटेड वाटत असला तरी ट्रम्प यांनी मात्र तसे काही म्हटलेले नाही. एखाद्या राष्ट्राध्यक्षाने माजी राष्ट्राध्यक्षाबाबतचा असा व्हिडीओ पोस्ट करणे हे धोकादायक मानले जात आहे.
कोणताही राष्ट्राध्यक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही, असे ओबामा सत्तेत आल्यानंतर म्हणाले होते. तो व्हिडीओ या व्हिडीओच्या सुरुवातीला जोडण्यात आला आहे. यानंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत जसे बसतात तसे दाखविण्यात आले आहे, त्यांच्या शेजारी ओबामा बसलेले दाखविण्यात आले आहे. मागून तीन एफबीआय एजंट येतात आणि ओबामांच्या मानगुटीला पकडून त्यांना जमिनीवर पाडतात, यानंतर ओबामा कैद्याच्या पोशाखात तुरुंगात जात असल्याचे अखेरीस दाखविण्यात आले आहे.
या व्हिडीओवरून अमेरिकेत गोंधळ उडाला असून अनेकांनी ट्रम्प हे एपस्टीन लीककेस पासून लोकांचे लक्ष भटकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. तसेच अशाप्रकारचे खोटे व्हिडीओ राष्ट्राध्यक्षाने शेअर करणे हे देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ट्रम्प हे २०१६ मध्ये निवडणूक जिंकले होते. यावेळी त्यांच्यावर निवडणुकीसाठी रशियाची मदत घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. हे सर्व ओबामा यांनी खोटे रिपोर्ट बनवून माध्यमांत लीक केले असा आरोप ट्रम्प प्रशासनाचा आहे. अधिकारी आणि ओबामा यांनी मिळून हा देशद्रोह केल्याचे गुप्तचर संस्थेच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी नुकताच केला होता. या प्रकरणाच्या नजरेतूनही ट्रम्प यांच्या या व्हिडीओकडे पाहिले जात आहे.