New Zealand Jacinda Ardern : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न देणार राजीनामा, पुढील महिन्यात पद सोडण्याची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 09:06 IST2023-01-19T09:05:56+5:302023-01-19T09:06:54+5:30
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

New Zealand Jacinda Ardern : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न देणार राजीनामा, पुढील महिन्यात पद सोडण्याची केली घोषणा
न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तसंच यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला राजीनामा देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅसिंडा अर्डन म्हणाल्या की मी निवडणूक लढवणार नाही, परंतु मला माहित आहे की न्यूझीलंडच्या लोकांवर परिणाम करणारे मुद्दे या वर्षी आणि निवडणुकीपर्यंत सरकारच्या लक्षात असतील.
न्यूझीलंडची लेबर पार्टी आगामी निवडणुकांमध्ये विजयी होईल याचा अर्डर्न यांना विश्वास आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुका १४ ऑक्टोबर रोजी होतील आणि तोपर्यंत आपण एक खासदार म्हणून काम करू. मला पराभवाची भीती आहे म्हणून मी राजीनामा देत नाही. आम्ही पुढील निवडणुका नक्कीच जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे, असं त्यांनी नमूद केलं. ७ फेब्रुवारी पूर्वी आपण राजीनामा देणार असल्याचेही अर्डन यांनी स्पष्ट केले.
“या राजीनाम्यामागे कोणतेही रहस्य नाही. मी एक माणूस आहे आणि जितकं बेस्ट देता येईल आम्ही देतो. परंतु माझ्यासाठी ही निर्णय घेण्याची वेळ आहे. या पदासोबत मोठी जबाबदारीदेखील असते. तसंच तुम्ही कधीपर्यंत लीडरशीपसाठी फीट आहात आणि कधी नाही हे ठरवण्याची जबाबदारीही असते,” असे अर्डर्न यांनी नमूद केले. माझ्याकडे पंतप्रधान म्हणून कायम राहण्याचे काय कारण आहे यावर मी विचार केला. त्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी सरकार चालवणं कठीण आहे हे यामगाचं कारण नाही. माझ्या या घोषणेनंतर सरकारी एजंसी आणि राजकीय पक्षांना योजना बवण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.