New Zealand मध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण, मोठ्या शहरात पुन्हा लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 20:52 IST2021-02-14T20:51:31+5:302021-02-14T20:52:50+5:30
New Zealand : एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्यानं खबरदारी म्हणून लागू करण्यात आला लॉकडाऊन. पंतप्रधानांचे दौरे रद्द, माहिती घेण्यासाठी परतल्या राजधानीत

New Zealand मध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण, मोठ्या शहरात पुन्हा लॉकडाऊन
कोरोना विषाणूनं अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला होता. परंतु न्यूझीलंडला कोरोनापासून दूर राहण्यात यश आलं होतं. परंतु आता न्यूझीलंडमध्येही पुन्हा एकदा तीन नवे रुग्ण सापडले आहेत. यानंतर न्यूझीलंडच्या सरकारनं न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या शहरात तीन दिवसांचा लॉकाडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांची कॅबिनेटच्या मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
"कोरोना विषाणूच्या नव्या रुग्णांबद्दल जोवर पूर्णपणे माहिती मिळत नाही तोवर आपण सतर्क राहणार आहोत. तसंच आता रुग्णांमध्ये सापडलेला कोरोना विषाणू यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक संक्रमण करणारा आहे का? याचीही माहिती घेतली जात आहे," असं जेसिंडा आर्डन म्हणाल्या. देशाच्या इतर भागांमध्येही काही प्रतिबंध कायम ठेवले जाणार आहेत. तसंच ऑकलंड व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आर्डन यांनी नमूद केलं.
दरम्यान, रविवारी एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाचं संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. जेसिंडा आर्डन यांनीदेखील आपले अन्य दौरे रद्द केले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास त्या वेलिंग्टनला परतल्या आहेत. इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडनं यापूर्वी कोरोनाचा सामना उत्तमरित्या केला होता. परंतु आता न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहे. अशा परिस्थितीत लोकांना न्यूझीलंडमध्ये पहिले दोन आठवडे क्वारंटाईन व्हावं लागतं. "इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंड कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या देशात परसण्यापासून रोखण्यात यशस्वी झाला आहे. परंतु अद्यापही नो रिस्क सारखी कोणतीही स्थिती नाही," अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूशी निगडीत कोविड १९ रेस्पोन्स मिनिस्टर क्रिस हिपकिंस यांनी दिली.