Minneapolis School Shooting: अमेरिकेतील मिनियापोलिस येथील कॅथोलिक शाळेत बुधवारी सकाळी झालेल्या गोळीबारात हल्लेखोरासह तीन जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात २० जण जखमीही झाले. हल्लेखोराकडून जप्त केलेल्या बंदुकीवरुन धक्कादायक माहिती समोर आली असून त्यामध्ये भारताचाही उल्लेख करण्यात आला आहे. यासोबतच, ही घटना घडवण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की त्यांनी ५० हून अधिक गोळ्यांचा आवाज ऐकला.
सुमारे ३९५ विद्यार्थी असलेल्या अॅननसिएशन कॅथोलिक स्कूल या प्राथमिक शाळेत ही गोळीबाराची घटना घडली. के-१२ शाळेतील गोळीबाराच्या डेटाबेसनुसार, जानेवारीपासून अमेरिकेतील ही १४६ वी गोळीबाराची घटना आहे. चर्चमध्ये मुले प्रार्थना करण्यासाठी जमली असताना हा हल्ला झाला. हल्लेखोराने चर्चच्या खिडक्यांमधून मुलांवर आणि आत बसलेल्या इतरांवर गोळीबार केला. या घटनेत ८ आणि १० वर्षे वयोगटातील दोन मुले ठार झाली, तर १७ जण जखमी झाले.
२३ वर्षीय रॉबिन वेस्टमन असं गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचे नाव आहे. त्याने कायदेशीररित्या तीन शस्त्रे खरेदी केली होती ज्यात एक रायफल, एक शॉटगन आणि एक पिस्तूल. आरोपीची कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. वेस्टमनने तीन शस्त्रांमधून डझनभर गोळ्या झाडल्या. त्याने चर्चच्या गोळीबार करताना दरवाजे बंद करण्याचा प्रयत्नही केला. तपास अधिकाऱ्यांनी वेस्टमन ट्रान्सजेंडर असल्याचे म्हटलं.
धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोराने गोळीबारात वापरलेल्या शस्त्रांवर 'माशाल्लाह', 'न्यूक इंडिया' आणि 'इस्रायल मस्ट फॉल' असे लिहिले होते. वेस्टरमनने हल्ल्यासाठी वापरलेल्या रायफलवर '६० लाख पुरेसे नव्हते' असेही लिहिले होते. ज्याचा अर्थ होलोकॉस्ट दरम्यान ६० लाख यहूदी मारले गेले हे पुरेसे नव्हते. तर स्मोक ग्रेनेडसारख्या बंदुकीवर 'ज्यू गॅस' असं देखील लिहिलेले होते. एका रायफलवर इस्रायलचा पराभव झाला पाहिजे असंही म्हटलं होतं. व्हिडिओमध्ये वेस्टनने यहूदी-विरोधी विचारसरणीवरही भाष्य केलं.
तपासातून वेस्टरमन हा सामूहिक हत्याकांडांच्या प्रकरणांचा तपशीलवार अभ्यास करत होता. हल्ल्याच्या अगदी आधी त्याने युट्यूबवर दोन व्हिडिओ पोस्ट केले होते, ज्यामध्ये त्याच्या कुटुंबाला लिहिलेली एक सुसाईड नोट होती. यामध्ये त्याने मानसिक आरोग्य समस्या आणि आत्महत्येच्या विचारांचा उल्लेख केला होता. घटनेनंतर अधिकाऱ्यांनी हे व्हिडिओ काढून टाकले.