सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 23:26 IST2025-09-10T23:25:46+5:302025-09-10T23:26:34+5:30

Nepal Protest: बालेंद्र शाहांनी फेसबूक पोस्टद्वारे स्वतः पंतप्रधानपद न स्वीकारण्याचे कारणही सांगिले.

Nepal Protest: Sushila Karki to be Nepal's Prime Minister; Balendra Shah declares support, appeals to protesters | सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...

सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...

Nepal Sushila Karki: नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनाने केपी शर्मा ओली यांची सत्ता उलथून टाकली. त्यानंतर आता देशाचे नेतृत्व कोण करणार? हे जवळजवळ निश्चित झाले आहे. या आंदोलनामुळे चर्चेत आलेले काठमांडूचे महापौर बालेंद्र उर्फ बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. आंदोलक तरुणांनी बालेन यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली होती, पण त्यांना यास नकार दिला आहे. आज आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरुन त्यांनी ही घोषणा केली आहे.

सुशीला कार्की यांना पूर्ण पाठिंबा 

बालेन शाह आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले की, 'प्रिय Gen-Z आणि सर्व नेपाळी लोकांना माझी विनंती आहे की, या चळवळीमुळे देशाची परिस्थिती एका ऐतिहासिक वळणावर आली आहे. सध्या देश अंतरिम सरकारच्या हाती जात आहे, ज्यांचे मुख्य काम नवीन निवडणुका घेणे आणि देशाला नवीन जनादेश देणे आहे. आता तुम्ही एका सुवर्ण भविष्याकडे वाटचाल करत आहात.'

'चळवळीशी संबंधित लोकांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, अंतरिम सरकारचे नेतृत्व माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे सोपवावे. त्यांचा आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सध्या सर्वांनी धीर धरावा. मी तुमच्या समजुतीचा, विवेकाचा आणि एकतेचा मनापासून आदर करतो. काही तरुण मित्र सध्या खूप घाईत आहेत. देशाला तुमच्या उत्कटतेची, तुमच्या विचारसरणीची, तुमच्या सचोटीची तात्पुरती नाही, तर कायमची गरज आहे. निवडणुका नक्कीच होतील, त्यासाठी कृपया घाई करू नका,' असे आवाहनदेखील त्यांनी केले.

पंतप्रधान न होण्याचे कारण सांगितले...
यासोबतच, त्यांनी राष्ट्रपतींना आंदोलकांनी आणलेल्या ऐतिहासिक क्रांतीचे जतन करण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन करण्यास आणि संसद बरखास्त करण्यास विलंब करू नये अशी विनंती केली आहे, जेणेकरून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीने पूर्ण होतील. बालेन शाह यांनी आपल्या पोस्टमधून पंतप्रधान न होण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, ही एक अंतरिम व्यवस्था आहे. निवडणुका जिंकल्यानंतर ते सरकारचे नेतृत्व करतील. 

Web Title: Nepal Protest: Sushila Karki to be Nepal's Prime Minister; Balendra Shah declares support, appeals to protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.