नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:34 IST2025-09-10T12:32:22+5:302025-09-10T12:34:40+5:30
शेर बहादुर देउबा असहाय्य आणि मजबूर होते, त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. एक माजी पंतप्रधान आक्रमक जमावाच्या गराड्यात अडकले होते.

नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
काठमांडू - शेर बहादुर देउबा यांच्या नेपाळ काँग्रेससोबत आघाडी करून केपी शर्मा ओली सरकार चालवत होते. शेर बहादुर देउबा यांची पत्नी आरजू देउबा ओली सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होत्या. या दोघांचं जबरदस्त वर्चस्व होते. शेर बहादुर जेव्हा पंतप्रधान होते, ते भारताचे निकटवर्तीय मानले जायचे. परंतु एका झटक्यात त्यांना रस्त्यावर यावे लागले. जर नेपाळ सैनिक वेळेवर पोहचले नसते तर कदाचित पती-पत्नीचा जीव वाचणे कठीण होते. शेर बहादुर यांना जमावाने घेरले होते, शरीरावर अनेक जखमा होत्या. रक्त वाहत होते. पत्नी आरजू यांच्यावरही जमावाने भीषण हल्ला केला.
शेर बहादुर देउबा असहाय्य आणि मजबूर होते, त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. एक माजी पंतप्रधान आक्रमक जमावाच्या गराड्यात अडकले होते. संतप्त जमाव त्यांना अशा पद्धतीने मारत होता, जसे ते चोर असावेत. आंदोलनकर्त्यांनी काठमांडू येथील देउबा यांच्या घरात पूर्णपणे तोडफोड केली. घरातील सर्व सामानाची नासधूस केली. व्हिडिओ फुटेजमध्ये देउबा यांच्या चेहऱ्यावरून रक्त येताना दिसत होते. देउबा आणि आरजू यांना वाचवण्यासाठी सैन्याचे जवान तिथे पोहचण्याआधीच घरात तोडफोड आणि जोडप्याला मारहाण करण्यात आली होती. सैन्य तिथे पोहचल्यानंतर तात्काळ या जखमी जोडप्याला वाचवण्यात आले नाहीतर स्थिती आणखी भयंकर झाली असती.
फक्त देउबा नव्हे तर नेपाळमधील अनेक मंत्री, राजकीय नेत्यांची हीच अवस्था आहे. संतापलेल्या युवकांनी राजकीय नेते, कॅबिनेट मंत्री आणि सरकारी इमारतींना मोठे नुकसान पोहचवले. त्यांचे पक्ष कार्यालय आणि पोलीस ठाण्यांनाही टार्गेट करण्यात आले. अर्थ मंत्री विष्णु प्रसाद पौडेल यांचीही काठमांडूच्या रस्त्यावर धिंड काढण्यात आली. कधीकाळी लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पळत होते, मात्र मंगळवारी त्यांनाच मारण्यासाठी लोक पाठलाग करत होते. जमावापासून वाचण्यासाठी अर्थ मंत्री रस्त्यावर पळताना दिसत होते.
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली
नेपाळमध्ये Gen- Z ने सरकारविरोधात मोठे आंदोलन केले. हे आंदोलन सोशल मीडिया बंदीविरोधात होते. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मंगळवारी परिस्थिती इतकी बिकट झाली होती. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली. सरकारी इमारती, नेत्यांच्या घरांवर आणि अगदी पशुपतिनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावरही हल्ला करण्यात आला. दरम्यान, आता नेपाळच्या लष्कर रस्त्यावर उतरले आहे.