Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 08:46 IST2025-09-11T08:44:54+5:302025-09-11T08:46:26+5:30

Nepal News: ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण असेल? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Nepal News: Sushila Karki poised to head interim government | Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!

Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!

नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तरुण-तरुणींनी देशाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि सध्या ते कुठेतरी लपून बसल्याची माहिती आहे. ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण असेल? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव आघाडीवर असून अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण असेल, यावर निर्णय घेण्यासाठी सुमारे चार तासांची व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत शेकडो लोकांनी भाग घेतला. बैठकीनंतर, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी सुशीला कार्की यांच्या नावावर एकमत व्यक्त केले आहे. त्यांनी सुशीला कार्की यांनी नेपाळचा कार्यभार सांभाळावा अशी इच्छा व्यक्त केली.

सुशीला कार्की कोण आहेत?
सुशीला कार्की, ज्यांचा जन्म ७ जून १९५२ रोजी विराटनगर येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर वकिली आणि कायदेशीर सुधारणांच्या क्षेत्रात आपले करिअर घडवले. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

शिक्षण
१९७२: विराटनगर येथील महेंद्र मोरंग कॅम्पसमधून बीए (कला शाखेची पदवी)
१९७५: वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एम.ए.)
१९७८: नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी (बॅचलर ऑफ लॉ)

करिअर
१९७९: त्यांनी विराटनगरमध्ये वकिलीची सुरुवात केली.
१९८५: धरन येथील महेंद्र मल्टिपल कॅम्पसमध्ये सहायक शिक्षिका म्हणून काम केले.
२००७: वरिष्ठ वकील झाल्या.
१८ नोव्हेंबर २०१०: त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली.
जुलै २०१६ ते जून २०१७: त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारीही सांभाळली.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत इतर नावे
सुशीला कार्की यांची निवड सोपी होणार नाही. त्यांच्या व्यतिरिक्त इतर काही नावंही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. यामध्ये कुलमान घिसिंग, सागर ढकाल, आणि हरका संपांग यांचा समावेश आहे.

Web Title: Nepal News: Sushila Karki poised to head interim government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.