नेपाळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुणांच्या आंदोलनामुळे तेथील सरकार कोसळलं, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामे दिला आहे. सर्वत्र जाळपोळ, विध्वंस पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर घातलेल्या बंदीनंतर नेपाळमध्ये Gen-Z अधिक आक्रमक झाले, रस्त्यावर उतरून त्यांनी अक्षरश: धुडगूस घातला.
अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून खूप जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर नेपाळमधील भयंकर परिस्थिती दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत आहेत. याच दरम्यान आंदोलकांनी जे काही दिसेल ते लुटल्याचं देखील समोर आलं आहे. रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी, इमारतींना आग लागली आहे, धुराचं साम्राज्य अशातच आंदोलनकर्त्यांनी खासगी मालमत्तांची तोडफोड केली आणि तेथील वस्तूंवर डल्ला मारला.
लोक मॉलमध्ये घुसले आणि सामान घेऊन पळून गेले. स्थानिक व्यावसायिकांना हिंसाचाराचा मोठा फटका बसला आहे. सुन्सरीच्या दुभाबी येथील भगवती चौधरी यांचं सुपरमार्केट लुटारूंच्या टार्गेटवर होतं. लोक कोणत्याही भीतीशिवाय मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू मोफत घेऊन जात आहेत.
असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक दुकानं लुटताना आणि पळून जाताना दिसत आहेत. @MihirkJha नावाच्या हँडलवरून X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये लोक मॉलमध्ये घुसून सामान लुटताना दिसत आहेत. महिला, पुरुष, लहान मुलं, तरुण प्रत्येकजण हातात येईल ते घेऊन पळताना दिसत आहे. लोक बाईकवर कपडे आणि भांडी घेऊन जात आहेत.
व्हिडिओ शेअर करताना एका युजरने "राजकारणी आणि त्यांच्या भ्रष्टाचारामुळे निराश होऊन, Gen-Z ने खासगी मालमत्ता, दुकानं आणि मॉल लुटण्याचा आणि तोडफोड करण्याचा निर्णय घेतला" असं म्हटलं आहे. असाच आणखी एक व्हिडीओ @divya_gandotra नावाच्या हँडलवरून X वर देखील शेअर करण्यात आला आहे. यामध्ये काही लोक रायफलसारख्या शस्त्रांसह पळून जाताना दिसत आहेत.