नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:21 IST2025-09-13T12:21:10+5:302025-09-13T12:21:39+5:30

ही गोष्ट ५२ वर्षांपूर्वीची आहे. नेपाळमधील विराटनगरहून एक विमान काठमांडूला जात होते.

Nepal Gen Z Protest: Nepal Prime Minister Sushila Karki's husband hijacked a plane; What was the Rs 30 lakh scandal? | नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

काठमांडू -  नेपाळच्या राजकीय उलथापालथीत अखेर सुशीला कार्की यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. कार्की अंतरिम सरकारचे नेतृत्व करतील. माजी मुख्य न्यायाधीश असलेल्या सुशीला कार्की यांना नेपाळच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानपदाची शपथ दिली. त्या देशातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. सुशीला कार्की यांना पंतप्रधानपद देण्यावरून बरेच मतभेद समोर आले. परंतु अखेर सर्व सहमतीने अटीशर्थीसह त्यांनाच पंतप्रधान बनवण्यात आले. सुशीला कार्की यांची प्रतिमा भलेही स्वच्छ असेल परंतु त्यांच्या पतीचा इतिहास वादग्रस्त आहे. एका प्लेन हायजॅकमध्ये त्यांच्या पतीचे नाव समोर आले होते. 

सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. त्यांच्या पतीचे नाव नेते दुर्गा प्रसाद सुबेदी असं आहे. सुशीला कार्की यांची त्यांच्यासोबत भेट उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) शिकत असताना झाली होती. विशेष म्हणजे ५२ वर्षांपूर्वी नेपाळच्या पहिल्या विमान अपहरणात सुबेदीचा सहभाग होता. सुशीला कार्कीच्या पतीने ज्या विमानाचे अपहरण केले होते त्या विमानात एक सुंदर बॉलिवूड अभिनेत्री होती. प्यासा आणि गीत सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माला सिन्हा देखील अपहरण झालेल्या विमानात होती.

नेमकं काय घडलं होते?

ही गोष्ट ५२ वर्षांपूर्वीची आहे. नेपाळमधील विराटनगरहून एक विमान काठमांडूला जात होते. १० जून १९७३ रोजी त्या विमानाचे अपहरण झाले. त्यात सरकारचे ३० लाख रुपये होते. नेपाळी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी कॅनडा-निर्मित १९ सीटचं ट्विन ऑटर विमानाचे अपहरण केले. विमानातील प्रवाशांमध्ये नेपाळचे अभिनेते जोडपे सीपी लोहानी आणि भारताच्या माला सिन्हा यांचा समावेश होता. सुशीला कार्की यांचे पती सुबेदी, नागेंद्र धुंगेल आणि बसंत भट्टराई हे रॉयल नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणात सहभागी होते. त्याचा कट गिरिजा प्रसाद कोईराला यांनी रचला होता, जे नंतर नेपाळचे पंतप्रधान झाले. विशेष म्हणजे हे नेपाळचे पहिले विमान अपहरण होते.

सुशीला कार्की यांचे पती सुबेदी यांची त्यावेळी नुकतीच तुरुंगातून सुटका झाली होती. ते कोईराला यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. नेपाळचे राजा महेंद्र यांच्या राजेशाहीविरुद्ध सशस्त्र संघर्षासाठी निधी उभारण्यासाठी हे विमान अपहरण करण्यात आले होते. अपहरण केलेल्या विमानात ३० लाख रुपयांचा सरकारी निधी होता. विमानातील क्रू ला धमकावून अपहरणकर्त्यांनी पायलटला बिहारमधील फारबिसगंज येथे गवताच्या पट्ट्यावर विमान उतरवण्यास भाग पाडले. इतर पाच कट रचणारे आधीच तिथे वाट पाहत होते. सुशील कोईराला फारबिसगंज येथे होते आणि विमानाला वेढा घालण्यात ते सक्रियपणे सहभागी होते.

दरम्यान, अपहरणकर्त्यांनी विमानातून फक्त तीन बॉक्स रोख रक्कम काढली आणि प्रवाशांना काहीही केले नाही. त्यानंतर विमानाने इतर प्रवाशांसह पुन्हा उड्डाण केले. ही रोकड रस्त्याने पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला नेण्यात आली. एका वर्षाच्या आत धुंगेल वगळता गटातील सर्व सदस्यांना भारतातील अधिकाऱ्यांनी अटक केली. सुबेदी आणि इतरांना दोन वर्षांसाठी तुरुंगवास भोगावा लागला. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांची सुटका झाली.

Web Title: Nepal Gen Z Protest: Nepal Prime Minister Sushila Karki's husband hijacked a plane; What was the Rs 30 lakh scandal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nepalनेपाळ