Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:55 IST2025-09-15T14:54:32+5:302025-09-15T14:55:01+5:30

नेपाळच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, जे देशाच्या सव्वा वर्षाच्या बजेटइतके आहे.

Nepal Gen-G Protest: Nepal in major economic crisis due to Gen-Z protests; Billions of rupees lost, 10,000 jobs lost | Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या

Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या

Nepal Gen-G Protest: नेपाळमध्ये अलीकडे झालेल्या Gen-Z आंदोलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आंदोलनातून उसळलेल्या हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीमुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, आंदोलनामुळे जवळपास १० हजार लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. याशिवाय, दरबार स्क्वेअर, पोखरा, भैरहवा आणि चितवनसारखी प्रमुख पर्यटनस्थळेही ओस पडली आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी येणाऱ्यांची संख्याही झपाट्याने कमी झाली आहे.

साधारणतः या काळात नेपाळमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. परदेशात राहणारे अनेक नेपाळी नागरिकही या हंगामात मायदेशी परत येतात, यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळते. पण, यावर्षी परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली आहे. यामागील प्रमुख कारण Gen-Z आंदोलन आहे.

अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा धक्का

काठमांडू पोस्टच्या अहवालानुसार या आंदोलनामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, जे देशाच्या सव्वा वर्षाच्या बजेटइतके आहे. सरकारी तसेच खासगी पायाभूत सुविधांना मोठी हानी पोहोचली आहे. अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या वर्षी आर्थिक वाढ दर १% च्याही खाली जाऊ शकतो. शिवाय, आगामी निवडणुकांमुळे सरकारवर आणखी ३० अब्ज रुपयांचा ताण येणार आहे.

उद्योग जगतावर परिणाम

नेपाळमधील मोठ्या व्यावसायिक गटांनाही या आंदोलनाचा तडाखा बसला आहे. भट-भटेनी सुपरमार्केट आणि चौधरी समूहाला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. एनसेल टेलिकॉम कंपनीलाही मोठी हानी झाली. हॉटेल असोसिएशन नेपाळच्या मते हॉटेल व्यवसायाला तब्बल २५ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे, तर ऑटो क्षेत्राने जवळपास १५ अब्ज रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र अनेक उद्योगपतींनी पुनर्निर्माणाची तयारी दर्शवलीही आहे. भट-भटेनीने आपल्या संदेशात "आम्ही आणखी बळकट होऊन परतू" असे म्हटले, तर चौधरी समूहाचे संचालक निर्वाण चौधरी यांनीही पुनर्निर्माण आणि उज्ज्वल भविष्याबद्दल विश्वास व्यक्त केला.

पर्यटन उद्योगाची पडझड

नेपाळच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन हा प्रमुख आधार आहे. सण-उत्सव आणि सुट्यांच्या काळात मोठी कमाई होते. पण यावर्षी उलट चित्र दिसत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल एजन्सीज रिकाम्या आहेत. दरबार स्क्वेअर आणि पोखरा यांसारख्या ठिकाणेही ओसाड पडली आहेत. पर्यटकांच्या संख्येत झालेल्या घसरणीचा थेट परिणाम लाखो लोकांच्या उपजीविकेवर झाला आहे. हॉटेल व्यावसायिक योगेंद्र शाक्य यांच्या मते खरी आव्हाने आगामी महिन्यांत राजकीय स्थिरता आणण्याची आहेत. परिस्थिती सुधारली नाही, तर पर्यटन उद्योग दीर्घकाळासाठी ठप्प राहू शकतो.

राजकीय स्थिरता आणि भविष्य

मार्च २०२६ मधील निवडणुकांपूर्वी नेपाळ सरकारला प्रचंड आर्थिक दबाव सहन करावा लागणार आहे. राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही कमी झाला आहे. मात्र, नव्या पंतप्रधानांच्या नियुक्तीमुळे सुधारण्याची आशा व्यक्त केली जात आहे. उद्योगजगताचे मत आहे की, जर राजकीय स्थिरता परतली, तर नेपाळ पुन्हा उभारी घेईल आणि अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होईल.

Web Title: Nepal Gen-G Protest: Nepal in major economic crisis due to Gen-Z protests; Billions of rupees lost, 10,000 jobs lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.