नेपाळमध्ये राजेशाहीवरून गोंधळ, संघर्षात दोन जणांचा मृत्यू, ३० जण जखमी; पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 22:18 IST2025-03-28T22:04:28+5:302025-03-28T22:18:54+5:30
शुक्रवारी नेपाळमधील लोकांनी राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने केली. हळूहळू या निदर्शनाचे रूपांतर हिंसाचारात झाले.

नेपाळमध्ये राजेशाहीवरून गोंधळ, संघर्षात दोन जणांचा मृत्यू, ३० जण जखमी; पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक
नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी निदर्शने केली काही वेळाने ही निदर्शने हिंसक झाली. आंदोलकांनी एका घराला आग लावली आणि सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी काठमांडूसह तीन ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला.
निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवारांचा वापर केला. टिनकुने भागात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. येथे हजारो राजेशाही समर्थकांनी नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा आणण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. येथे, पंतप्रधान केपी ओली यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
नेपाळ पेटले! हिंदूराष्ट्र आणि राजेशाहीच्या मागणीसाठी आंदोलन, रॅलीत झळकले CM योगींचे पोस्टर
मिळालेली माहिती अशी, काठमांडू येथील २९ वर्षीय सबीन महार्जन यांना या संघर्षादरम्यान गोळी लागल्याने रुग्णालयात मृत्यू झाला. टिनकुने परिसरातील एका इमारतीतून निषेधाचा व्हिडीओ शूट करताना अॅव्हेन्यूज टेलिव्हिजनचे छायाचित्रकार सुरेश रजक यांचा मृत्यू झाला. टिनकुने भागात, राजेशाही समर्थकांची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट झाली आणि त्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांनी नेपाळचा राष्ट्रध्वज आणि माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांचे फोटो हातात घेतले होते. त्यांची पोलिसांशी झटापट झाली. या चकमकीत एक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. राजेशाही समर्थक आणि विरोधकांनी वेगवेगळी निदर्शने केल्याने संघर्ष टाळण्यासाठी काठमांडूमध्ये शेकडो दंगलविरोधी दल तैनात करावे लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पश्चिम काठमांडूच्या रस्त्यांवर सैन्य तैनात करण्यात आले.