‘नासा’चे ‘अपॉर्च्युनिटी’ रोव्हर मंगळावर ‘मृत’ झाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:59 AM2019-01-29T03:59:20+5:302019-01-29T06:45:32+5:30

धुळीच्या वादळाने हानी; चार्जिंग बंद पडल्याने सात महिन्यांपासून संपर्क तुटला

NASA's Opportunity Rover Fear of 'Dead' on Mars | ‘नासा’चे ‘अपॉर्च्युनिटी’ रोव्हर मंगळावर ‘मृत’ झाल्याची भीती

‘नासा’चे ‘अपॉर्च्युनिटी’ रोव्हर मंगळावर ‘मृत’ झाल्याची भीती

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेने १५ वर्षांपूर्वी मंगळावर पाठविलेले ‘अपॉर्च्युनिटी’ रोव्हर सौर बॅटऱ्यांचे चार्जिंग बंद झाल्याने कायमचे ‘मृत’ झाले असावे, अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

हे रोव्हर सौरऊर्जेवर चालते. त्यात सूर्यप्रकाशापासून ऊर्जा तयार करून बॅटऱ्या चार्ज करून घेण्याची व्यवस्था होती. गेल्या जूनमध्ये मंगळावर धुळीचे वादळ झाल्यामुळे रोव्हरच्या सोलर पॅनल्सपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचणेही अशक्य झाले. परिणामी, रोव्हर ‘निद्रावस्थेत’ गेलेल्या रोव्हरकडून कोणताही संदेश आला नाही. येथून दिलेल्या आज्ञांचेही ते पालन करीत नव्हते. पुढे धुळीचे वादळ निवळले तरी बॅटऱ्या चार्ज होऊन ते ‘जागे’ होण्याची चिन्हे नाहीत.

या मिशनचे प्रधान संशोधन अधिकारी स्टीव्हन्न स्क्वायरेस म्हणाले की, आम्ही आशा सोडलेली नाही; पण रोव्हरचे आयुष्य संपले असावे. तसे असेल तर ते चांगलेच आहे. कारण हे ‘सन्मानाचे’ मरण आहे! कॅलिफोर्निया येथील जेट प्रॉपेल्शन लेबॉरेटरीमधील मिशनचे मॅनेजर जॉन कॅल्लास म्हणाले की, सात महिन्यांत आम्ही ‘अपॉर्च्युनिटी’शी संपर्क साधण्याचे ६०० हून अधिक वेळा प्रयत्न केले आहेत व यापुढेही करीत राहू. हे रोव्हर पुनरुज्जीवित होण्याची शक्यता मावळत असली तरी तर्काला पटेल तोपर्यंत प्रयत्न करीत राहणे, हे आमचे काम आहे.
रोव्हरच्या सोलर पॅनल्सवरील धुळीचे थर वादळानेच दूर होऊन ते स्वच्छ होतील आणि बॅटऱ्या चार्ज करतील, अशी आशा होती; परंतु वादळांचा मोसमही सरून गेल्याने आता तसे होणेही शक्य वाटत नाही. मंगळाच्या दक्षिण गोलार्धात आता हिवाळा सुरू होईल, तेव्हा तापमान कमालीचे थंड असेल. गोठणबिंदूच्याही खाली जाणाºया तापमानात बॅटऱ्या, अंतर्गत वायरिंग व संगणक यंत्रणा यांचे नुकसान होऊ शकते. परिणामी, मरणासन्न रोव्हरमध्ये पुन्हा धुगधुगी येण्याच्या आशाही संपुष्टात येतील. (वृत्तसंस्था)

स्पिरिट झाले निवृत्त
नासा’ने फ्लोरिडामधील केप कॅनेव्हेरालमधून २००३ मध्ये ‘अ‍ॅपॉर्च्यनिटी’ व ‘स्पिरिट’ रोव्हर मंगळावर पाठविली होती. त्यापैकी ‘स्पिरिट’ ठरलेले मिशन पूर्ण करून २०११ मध्ये निवृत्त झाले.

Web Title: NASA's Opportunity Rover Fear of 'Dead' on Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा