अंतराळात असताना केला गुन्हा, ‘नासा’ करतेय तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:52 AM2019-08-26T04:52:11+5:302019-08-26T04:52:42+5:30

महिला अंतराळवीर आरोपी : अंतराळातून बँक खात्याचा चोरला तपशील

NASA investigates crime committed while in space | अंतराळात असताना केला गुन्हा, ‘नासा’ करतेय तपास

अंतराळात असताना केला गुन्हा, ‘नासा’ करतेय तपास

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या महिला अंतराळवीर अ‍ॅने मॅक्लीन यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावर (आयएसएस) वास्तव्यास असताना केलेल्या कथित गुन्ह्याचा अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने तपास सुरू केला आहे. अंतराळात केलेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे मानले जाते.


अंतराळ तळावरील सहा महिन्यांच्या वास्तव्यानंतर अंतराळवीर अ‍ॅने मॅक्लिन गेल्या जूनमध्ये पृथ्वीवर परतल्या. समलिंगी विवाहातील त्यांच्या पत्नी समर वोर्डन यांनी केलेल्या तक्रारीवरून ‘नासा’चे इन्स्पेक्टर जनरल (आयजी) कार्यालय हा तपास करीत आहे. समर वोर्डन याही अंतराळवीर आहेत. तपासी अधिकाऱ्यांनी दोघींशीही संपर्क साधला असल्याचे कळते.


मॅक्लीन व वोर्डन यांच्यात सध्या घटस्फोट आणि मुलांच्या ताब्यावरून न्यायालयात वाद सुरू आहे. मॅक्लीन यांनी अंतराळ तळावर असताना आपल्या व्यक्तिगत बँक खात्याचा ओळख प्रस्थापित करणारा तपशील ‘चोरला’ व आपल्या आर्थिक व्यवहारांची चोरून माहिती करून घेतली, असा वोर्डन यांचा आरोप आहे.


वोर्डन यांच्या म्हणण्यानुसार, आपली ‘पत्नी’ आपल्यासोबत राहत नाही तरी आपण नव्या मोटारीची केलेली खरेदी, त्यासाठी दरमहा द्यावा लागणारा हप्ता इत्यादी तपशील तिला कसा कळतो, याविषयी आपल्याला संशय होता. यावरून बँकेकडे चौकशी करता त्यांनी माझे बँक खाते ‘नासा’मधील एका संगणकावरून ‘अ‍ॅक्सेस’ केले गेल्याचे कळले. हा संगणक कोणता आहे, याचा मागोवा घेतला असता तो मॅक्लीनचा आहे व त्यांनी अंतराळ तळावर असताना त्या संगणकावरून बँक खाते ‘अक्सेस’ केले, असे उघड झाले.


मॅक्लीन यांचा बचाव करताना त्यांचे वकील म्हणाले की, अ‍ॅने यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. मुलांच्या संगोपनासंदर्भात अ‍ॅने व समर या दोघी अद्यापही काही व्यवहार एकत्रितपणे करीत असतात. त्यासाठी दोघींचे एक संयुक्त बँक खाते आहे. अ‍ॅने यांनी समर यांचे व्यक्तिगत नव्हे, तर हे संयुक्त बँक खाते ‘अ‍ॅक्सेस’ केले होते. (वृत्तसंस्था)

मॅक्लीन म्हणतात, आरोपात तथ्य नाही
मॅक्लीन यांनी टिष्ट्वटरवर एक संक्षिप्त निवेदन प्रसिद्ध करून वोर्डन यांच्या आरोपांचा इन्कार केला. त्यांनी लिहिले की, वोर्डन यांच्या आरोपांत अजिबात तथ्य नाही. आमच्या दोघींमध्ये घटस्फोटाचे क्लेशकारी प्रकरण सुरू असून, आता तो माध्यमांत चर्चेचा विषय झाला आहे. लोकांना यात असलेले औत्सुक्य मी समजू शकते. ‘आयजी’ कार्यालयावर माझा पूर्ण विश्वास असून, त्यांचा तपास पूर्ण होईपर्यंत मी त्याविषयी कोणतेही भाष्य करणार नाही.

Web Title: NASA investigates crime committed while in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा